दिवाळीत करा स्वस्त प्रवास; पुणे-अमरावती-पुणे एक्स्प्रेसला मुदतवाढ!
By दिनेश पठाडे | Published: September 29, 2023 03:01 PM2023-09-29T15:01:40+5:302023-09-29T15:02:09+5:30
विशेष दर्जा काढल्यामुळे येत्या काही दिवसांत तिकीट दरातही कपात होण्याची शक्यता आहे.
वाशिम : प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता पुणे-अमरावती-पुणे साप्ताहिक विशेष रेल्वेला मुदतवाढ देण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. खासगी ट्रॅव्हल्सचे दिवाळीच्या कालावधीत पुणे-वाशिम-पुणे चे तिकीट २ हजारांवर पोहचते. अशावेळी या रेल्वेने सध्याच्या तिकीटदरानुसार स्लीपरने ४७० रुपयांत प्रवास करणे शक्य आहे. विशेष दर्जा काढल्यामुळे येत्या काही दिवसांत तिकीट दरातही कपात होण्याची शक्यता आहे.
त्यानुसार २९ सप्टेंबरपर्यंत नियोजित असलेले गाडी क्रमांक ०१४३९ पुणे-अमरावती विशेष एक्स्प्रेसला १ ऑक्टोंबर ते १७ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. सोमवार आणि शुक्रवारी पुणे येथून रात्री १०:५० वाजता सुटून वाशिम येथे दुसऱ्या दिवशी दुपारी १२:५४ मिनिटांनी पोहोचेल १ मिनिटाच्या थांब्यानंतर अमरावतीकडे मार्गस्थ होईल. या कालावधीत रेल्वेच्या १४ फेऱ्या होतील. तर ३० सप्टेंबरपर्यंत नियोजित असलेले गाडी क्रमांक ०१४४० अमरावती-पुणे एक्स्प्रेसला २ ऑक्टोंबर ते १८ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे.
ही रेल्वे अमरावती येथून दर सोमवार आणि शनिवारी सायंकाळी ७:५० वाजता निघून वाशिम येथे रात्री १०:२९ वाजता पोहचेल. दुसऱ्या दिवशी दुपारी ४:२० वाजता पुणे स्थानकावर पोहचेल. अप-डाऊनच्या १४ फेऱ्या होणार आहेत. पुणे-अमरावती-पुणे एक्स्प्रेसला उरुळी, केडगाव, दौंड, जिन्ती रोड, जेऊर, कुर्डवाडी, बार्शी टाऊन, उस्मानाबाद, लातूर, लातूर रोड, परळी वैजनाथ, परभणी, पूर्णा, वसमत, हिंगोली, वाशिम, अकोला, मूर्तीजापूर, बडनेरा येथे थांबा आहे. दरम्यान, या विशेष एक्स्प्रेसचा विशेष दर्जा काढून नियमित क्रमांक दिला आहे. त्यामुळे नवीन वेळापत्रकात रेल्वेचा लुज टाइम कमी होण्याची शक्यता आहे.