‘मुद्रा बँक’ योजनेतून कर्ज देण्यास बँकांची टाळाटाळ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2019 02:39 PM2019-03-27T14:39:52+5:302019-03-27T14:40:21+5:30
सर्व कागदपत्रांची पुर्तता करून आणि पात्र असतानाही ‘मार्च एन्डींग’च्या नावाखाली कर्ज मागणीचे अनेक प्रस्ताव प्रलंबित असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : बेरोजगार युवकांना हक्काचा रोजगार मिळावा, यासाठी अंमलात आलेल्या ‘मुद्रा बँक’ योजनेतून कर्ज मिळत नसल्याच्या तक्रारीमध्ये हल्ली वाढ झाली आहे. सर्व कागदपत्रांची पुर्तता करून आणि पात्र असतानाही ‘मार्च एन्डींग’च्या नावाखाली कर्ज मागणीचे अनेक प्रस्ताव प्रलंबित असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
लघु उद्योगांना सहज कर्ज पुरवठा व्हावा, या उद्देशाने ८ एप्रिल २०१५ पासून २० हजार करोड रुपये भांडवल असलेली ‘मायक्रो युनिट्स डेव्हलपमेंट अँड रिफायनान्स एजन्सी’ अर्थात मुद्रा बँक कर्ज योजना अंमलात आली. यामाध्यमातून छोटे कारखानदार, दुकानदारांना कर्ज देणे, ज्यांना नवा उद्योग करायचा असेल त्यांनाही कर्ज पुरवठा करण्यासोबतच भाजीविक्रेते, सलून, फेरीवाले, चहाटपरी चालकांना कर्ज देण्याचे शासनाने जाहीर केले. शिशू श्रेणीअंतर्गत ५० हजार रुपयांचे कर्ज, किशोर श्रेणीत ५० हजार रुपयांपासून ५ लाख रुपयांपर्यंत कर्ज आणि तरुण श्रेणीअंतर्गत ५ लाख रुपयांपासून १० लाख रुपयांपर्यंत कर्ज देण्याची सोय करण्यात आलेली आहे. प्रत्यक्षात मात्र सर्व आवश्यक कागदपत्रांची पुर्तता करूनही अनेक पात्र बेरोजगार युवकांना बँकांकडून कर्ज मिळणे अशक्य झाल्याचे दिसून येत आहे. यामुळे बेरोजगारांमधून संताप व्यक्त होत आहे.
प्रशासनाकडे प्राप्त होणाऱ्या तक्रारींचा तत्काळ निपटारा करून पात्र लाभार्थ्यांना कर्ज पुरवठा उपलब्ध करून देण्याच्या सूचना बँकांना दिल्या जात आहेत. विशेष म्हणजे २०१८-१९ या आर्थिक वर्षात वाशिम जिल्ह्याने उद्दीष्ट पूर्ण केले असून ९५ कोटींचा कर्जपुरवठा यामाध्यमातून करण्यात आला आहे.
- डी.व्ही. निनावकर
व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक, वाशिम