बँकांनी कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:27 AM2021-06-26T04:27:42+5:302021-06-26T04:27:42+5:30
२४ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटाक सभागृहात आयोजित जिल्हास्तरीय बँकिंग समितीच्या सभेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य ...
२४ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटाक सभागृहात आयोजित जिल्हास्तरीय बँकिंग समितीच्या सभेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, स्टेट बँक ऑफ इंडियाचे क्षेत्रीय प्रबंधक भालचंद्र काटकर, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक शंकर कोकडवार, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक दत्तात्रय निनावकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी म्हणाले, ज्या बँकांनी सन २०२१-२०२२ चे खरीप पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण केले नाही, त्यांनी ते ३१ जुलैपर्यंत पूर्ण करावे. कोणत्याही खातेदार शेतकऱ्याची याबाबत तक्रार येणार नाही, याची दक्षता संबंधित बँकांनी घ्यावी, असे त्यांनी सांगितले.
बँकांनी पीक कर्ज वाटपाची गती वाढविण्याकरिता मेळावे घ्यावेत. पीक कर्ज वाटपाबाबत नकारात्मक भूमिका असू नये. ज्या बँकांनी पीक कर्ज वाटपाकडे दुर्लक्ष केले, त्या बँकामध्ये असलेल्या शासनाच्या ठेवी काढून ज्या बँकांनी अधिक प्रमाणात कर्ज वाटप केले, त्याठिकाणी ठेवण्यात येतील, असे जिल्हाधिकारी म्हणाले.
......................
‘त्या’ बचतगटांचे बॅंक खाते तत्काळ काढा
बँकांनी बचतगटांना सामाजिक भावनेतून कर्ज पुरवठा करावा, असे सांगून जिल्हाधिकारी शन्मुगराजन एस. म्हणाले, जिल्ह्यात जवळपास ५०० बचतगटांचे बॅंक खाते अद्यापही बॅंकांनी काढलेले नाही. कागदपत्रांची पूर्तता करुन घेऊन येत्या १५ दिवसांत बँक खाते काढण्यात यावे. जिल्हा उद्योग केंद्र तसेच विविध महामंडळाची कर्ज प्रकरणे आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करुन त्वरित मंजूर करावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.
................
१ हजार ७७ कोटींचे कर्ज वाटप
यावेळी जिल्हा अग्रणी बॅंक प्रबंधक निनावकर यांनी सांगितले की, जिल्ह्याचा सन २०२०-२०२१ चा वार्षिक ऋण आराखडा २ हजार ८० कोटी रुपयांचा होता. त्यापैकी १ हजार ७ कोटी रुपये कर्ज वाटप करण्यात आले. तसेच खरीप पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट १ हजार २५ कोटी रुपये देण्यात आले. २३ जूनपर्यंत ७४ हजार ७२८ खातेदारांना ६१० कोटी ५५ लाख रुपये पीक कर्ज वाटप केल्याची माहिती त्यांनी दिली.