बँकांनी कर्जाची मागणी करणाऱ्या व्यक्तींची दिशाभूल करु नये !
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2022 12:30 PM2022-09-27T12:30:20+5:302022-09-27T12:31:04+5:30
जिल्हास्तरीय बँकर्सच्या सभेत खरीप पिक कर्जासह विविध महामंडळाच्या तसेच विभागाच्या योजनांच्या कर्ज प्रकरणांचा आढावा घेताना ते बोलत होते.
वाशिम (संतोष वानखडे) : वाशिम हा जिल्हा आकांक्षीत असल्यामुळे केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभार्थ्यांना लाभ देण्याच्या दृष्टीने बँकांनी कर्ज प्रकरणांतील त्रूटींची पुर्तता करावी. बँकांनी उद्योग, व्यवसाय सुरु करण्यासाठी कर्जाची मागणी करणाऱ्या व्यक्तींची दिशाभूल करु नये, अशा स्पष्ट सूचना जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी बॅंकांना दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात जिल्हास्तरीय बँकर्सच्या सभेत खरीप पिक कर्जासह विविध महामंडळाच्या तसेच विभागाच्या योजनांच्या कर्ज प्रकरणांचा आढावा घेताना ते बोलत होते.
यावेळी सहायक जिल्हाधिकारी मिन्नू पी.एम. जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक दिनेश बारापात्रे, जिल्हा उपनिबंधक दिग्विजय राठोड, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक एस.डी. खंबायत, माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी राजेश नागपूरे, विविध बँकाचे जिल्हा समन्वयक, महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक व विविध बँकांचे शाखा व्यवस्थापक उपस्थित होते. जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. म्हणाले की, जिल्हा आकांक्षीत असल्यामुळे केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभार्थ्यांना लाभ देण्याच्या दृष्टीने कर्ज प्रकरणे बँकांनी त्रृटीची पुर्तता करुन तातडीने मंजूर करावी. बँकांनी उद्योग/व्यवसाय सुरु करण्यासाठी कर्जाची मागणी करणाऱ्या व्यक्तींची दिशाभूल करु नये. ऑक्टोबरपर्यंत सर्व महामंडळांनी कर्ज प्रकरणे कोणत्याही परिस्थीतीत बँकांकडे सादर करावी. सर्व बँक शाखांनी त्यांच्याकडे आलेली कर्ज प्रकरणे तातडीने निकाली काढण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. सर्वच बँक खात्याशी आधार क्रमांक जोडावा. जिल्हयातील तरुण, तरुणींना तसेच बेरोजगार व्यक्तींना रोजगार उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम आणि मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम या योजनांची कर्ज प्रकरणे एका विशिष्ट कालावधीतच मंजूर करण्यात यावी, असे निर्देशही शण्मुगराजन एस. यांनी दिले.