जिल्ह्यातील ३४ हजारांवर विद्यार्थ्यांचे ‘आधार’ जुळेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:36 AM2021-01-22T04:36:37+5:302021-01-22T04:36:37+5:30
शासनाच्या २९ सप्टेंबर २०२० च्या परिपत्रकानुसार सर्व माध्यमांच्या, सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमधील सर्व विद्यार्थ्यांची आधार नोंदणी करण्याच्या सूचना निर्गमित करण्यात ...
शासनाच्या २९ सप्टेंबर २०२० च्या परिपत्रकानुसार सर्व माध्यमांच्या, सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमधील सर्व विद्यार्थ्यांची आधार नोंदणी करण्याच्या सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. प्रत्यक्षात जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांची पदे निश्चित करताना फक्त आधार नोंदणीकृत विद्यार्थ्यांची संख्याच ग्राह्य धरण्यात येणार आहे. त्यामुळे शिक्षण उपसचिवांनी यासंदर्भात १० जानेवारी रोजी सर्व जिल्हा परिषदेच्या सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांना पत्र पाठवून शासन परिपत्रकान्वये विद्यार्थ्यांची आधार नोंदणी करण्याबाबत सूचना देण्याचे निर्देश दिले. त्यानंतर जिल्ह्यात विद्यार्थ्यांच्या आधार नोंदणीला गती देण्यात आली. यात जिल्हाभरातील दोन लाख सव्वीस हजार २३ विद्यार्थ्यांची आधार नोंदणी झालेली आहे. तथापि, त्यापैकी ३४७२८ विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक जुळत नसल्याने त्या विद्यार्थ्यांची माहिती संच मान्यतेसाठी ‘सरल’वर अपलोड होणे अशक्य झाले आहे.
--------------
तांत्रिक अडचणींचा खोडा
संच मान्यतेसाठी आधार नोंदणी झालेल्या विद्यार्थ्यांची संख्याच ग्राह्य धरली जाणार असल्याने शासकीय आणि खासगी संस्थांच्या शाळाही अधिकाधिक विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अद्ययावत करण्यासाठी धडपड करीत आहेत. यासाठी विद्यार्थ्यांसह शिक्षकही आधार नोंदणी केंद्रांकडे धाव घेत आहेत. तथापी, नेट कनेक्टिव्हिटी नसणे, आधार मशीन नादुरुस्त असणे आदी अडचणी उद्भवत असल्याने विद्यार्थ्यांचे आधार अद्ययावत करणे कठीण झाले आहे.
-----------------
विद्यार्थ्याच्या आधार क्रमांकाची स्थिती
वर्ग
१ ते ८
विद्यार्थी
१६६८८१
आधार मॅच
१४३८७२
आधार अनमॅच
२३००९
-------
वर्ग
९ ते १२
विद्यार्थी
८२८५१
आधार मॅच
७०४३२
आधार अनमॅच
११७१९
------------
कोट : विद्यार्थ्यांच्या आधार नोंदणी प्रक्रियेंंतर्गत माध्यमिक शाळांतील ८२८५१ विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे. तथापी, त्यापैकी ११७१९ विद्यार्थ्यांची माहिती जुळत नसल्याने त्यांना आधार कार्डमध्ये दुरुस्ती करावी लागणार आहे. त्यासाठी शिक्षक आणि विद्याथ्यांची सतत धडपड सुरू आहे. तथापि, आधार केंद्रावर विविध तांत्रिक अडचणी येत असल्याने विलंब होत आहे.
- रमेश तांगडे,
शिक्षणाधिकारी (माध्यमिक)
जि. प. वाशिम