कोरोनाकाळात ज्येष्ठ नागरिकांना मायेचा आधार !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2020 12:46 PM2020-10-06T12:46:34+5:302020-10-06T12:46:40+5:30
Washim News, Senior Citizen गत १० दिवसात २७ जणांना मायेचा आधार मिळाला.
वाशिम : ज्येष्ठ नागरिकांना कोरोना संसर्गाचा सर्वाधिक धोका असल्याचे सांगितले जाते. कोरोनाकाळात समाजातील शेवटच्या घटकातील, गोरगरीब ज्येष्ठ नागरिकांना शोधून त्यांना वैद्यकीय उपचार व भौतिक गरजा पुरविण्यासाठी निती आयोग, जिल्हाधिकारी कार्यालय व राजरत्न अल्पसंख्याक शिक्षण प्रसारक व बहुद्देशीय संस्थेने दादा-दादी, नाना-नाणी अभियान हाती घेतले असून, गत १० दिवसात २७ जणांना मायेचा आधार मिळाला.
कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात २४ मार्चपासून लॉकडाऊन आहे. जुलै महिन्यापासून अनलॉकचे टप्पे सुरू झाले असून, यामुळे जनजीवन पूर्वपदावर येत आहे. परंतू, कोरोना विषाणू संसर्गाचा धोका लक्षात घेता ज्येष्ठ नागरिकांवर आरोग्य विभागासह जिल्हा प्रशासनाचे विशेष लक्ष आहे. गोरगरीब ज्येष्ठ नागरिकांना आरोग्य उपचार, भौतिक सुविधा उपलब्ध करण्यासाठी जिल्हाधिकारी ऋषिकेश मोडक, उपजिल्हाधिकारी सुहासिनी गोणेवार, नायब तहसिलदार कैलास देवळे, निती आयोगाच्या माधुरी नंदन यांच्या मार्गदर्शनात राजरत्न बहुद्देशीय संस्था व प्रशासनातर्फे दादा-दादी, नाना-नाणी अभियान राबविले जात आहे. गरजू ज्येष्ठ नागरिकांना आरोग्य उपचार, कपडे व अन्य भौतिक सुविधा पुरविण्यात येतात. मोबाईलद्वारे संपर्क साधल्यास अभियानातील कर्मचारी, स्वयंसेवी संस्थेचे पदाधिकारी समस्या जाणून त्या सोडविण्याचा प्रयत्न करतात. गत १० दिवसात २७ नागरिकांपर्यत हे अभियान पोहचले असून, तोंडगाव येथील काही ज्येष्ठ नागरिकांना आरोग्य सुविधा व कपड्यांचे वाटप जिल्ह्याधिकारी कार्यालय प्रतिनिधी तलाठी साबळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राजरत्न संस्थेचे विनोद पट्टेबहादुर, भगवान ढोले, देवा सारसकर, नंदकिशोर वनस्कर, विकास पट्टेबहादुर, अमोल कलकर विकी ढोले यांची उपस्थिती होती.