मालेगाव तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2020 04:20 PM2020-12-14T16:20:12+5:302020-12-14T16:20:20+5:30
Gram panchayat Election News कोरोनाच्या सावटाखाली निवडणुकीची रणधुमाळी चांगलीच रंगत असल्याचे दिसून येते.
मालेगाव : तालुक्यातील ३० ग्रामपंचायतींचा पाच वर्षाचा कार्यकाळ संपला असून, या ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक होत आहे. कोरोनाच्या सावटाखाली निवडणुकीची रणधुमाळी चांगलीच रंगत असल्याचे दिसून येते.
मालेगाव तालुक्यातील ३० ग्राम पंचायतींचा पाच वर्षाचा कार्यकाळ हा आॅगस्ट ते डिसेंबर २०२० या काळात संपत आला आहे. कोरोनामुळे या ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच, सदस्य मंडळ बरखास्त करून प्रशासक म्हणून जिल्हा परिषदेंतर्गत येणाºया अधिकारी, कर्मचाºयांची नियुक्ती केली होती. नोव्हेंबर महिन्यापासून कोरोनाचा आलेख खाली आला आहे. त्यामुळे अन्य ठिकाणी निवडणूका होत आहेत. राज्यातही ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहिर झाला आहे. मालेगाव तालुक्यात ग्रामपंचायतीचा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहिर होताच, भेटीगाठींवर भर देण्यात येत आहे. कोरोनामुळे यंदाची निवडणूक विशेष ठरण्याची चिन्हे आहेत. तालुक्यातील राजकीय परिस्थिती पाहता, सर्वच पक्ष स्वतंत्र लढण्याच्या तयारीत दिसत आहेत. ग्रामपंचायत निवडणूक ही पक्षाच्या बॅनरऐवजी स्थानिक पातळीवर स्वतंत्र आघाडी, पॅनल उभे करून शक्यतोवर लढविली जाते. यावेळी नेमके कसे चित्र राहिल, हे अद्याप निश्चित झाले नाही. ग्रामपंचायत ताब्यात घेण्यासाठी सत्ताधाºयांसह विरोधकांनी मोर्चेबांधणीला वेग दिल्याचे दिसून येते. मतदारांच्या भेटीगाठी घेत उमेदवार कसा सक्षम आहे, हे पटवून देण्याचा प्रयत्न केला जात आहे. काही पक्षांच्या नेत्यांनी बैठकींना सुरुवात केली आहे. निवडणूक निमित्ताने ग्रामपंचायत क्षेत्रात राजकीय घडामोडींना वेग येत असल्याचे दिसून येते.
युवा वर्ग राजकारणात
ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये मोठ्या संख्येने युवा वर्ग रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. सर्वच पक्षांकडून बैठकांना सुरुवात झाली असून, युवा उमेदवारावर भर देण्यात येत आहे. सरपंचपदासाठीचे आरक्षण यापूर्वीच जाहीर झालेले आहे. युवावर्ग निवडणुकीच्या आखाड्यात उतरत असल्याने अधिकच चुरस निर्माण होत आहे.
या आहेत ३० ग्रामपंचायती
मालेगाव तालुक्यातील जोडगव्हाण, करंजी, डोंगरकिन्ही, गांगलवाडी, खैरखेडा, मुंगळा, राजुरा, उमरवाडी, वाकळवाडी, चिवरा, किन्हीराजा, काळाकामठा, कळंबेश्वर, कोलदरा, मारसूळ, मेडशी, उमरदरी, वरदरी बु., वारंगी, शिरपूर, बोराळा जहांगीर, डही, ढोरखेडा, एकंबा, जऊळका, खिर्डा, पांगरी कुटे, शिरसाळा, वसारी, तिवळी या ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक होत आहे.