वाशिम तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 05:18 PM2020-12-22T17:18:39+5:302020-12-22T17:20:27+5:30
Gram Panchayat elections यामध्ये बाजी कोण मारणार? याकडे राजकीय क्षेत्राचे लक्ष लागून आहे.
वाशिम : तालुक्यातील २४ ग्रामपंचायतींचा पाच वर्षाचा कार्यकाळ संपला असून, या ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक होत आहे. या निवडणुकीमुळे दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली असून, यामध्ये बाजी कोण मारणार? याकडे राजकीय क्षेत्राचे लक्ष लागून आहे.
वाशिम तालुक्यातील २४ ग्राम पंचायतींचा पाच वर्षाचा कार्यकाळ हा आॅगस्ट ते डिसेंबर २०२० या काळात संपत आला आहे. कोरोनामुळे या ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच, सदस्य मंडळ बरखास्त करून प्रशासक म्हणून जिल्हा परिषदेंतर्गत येणाºया अधिकारी, कर्मचाºयांची नियुक्ती केली होती. नोव्हेंबर महिन्यापासून कोरोनाचा आलेख खाली येत असल्याने ग्रामपंचायत निवडणुका होत आहे. वाशिम तालुक्यातील तोंडगाव, काटा, तामशी, सावरगाव जिरे, अडोळी, अनसिंग, पार्डी टकमोर, काजळांबा या महत्वपूर्ण ग्रामपंचायतींसह एकूण २४ ग्रामपंचायतींमध्ये निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले आहे. तालुक्यातील राजकीय परिस्थिती पाहता, महाविकास आघाडी होण्याची शक्यता धूसर बनत आहे. सर्वच पक्ष, आघाड्या, पॅनल या स्वतंत्र लढण्याच्या तयारीत दिसून येत आहेत. ग्रामपंचायत निवडणूक ही पक्षाच्या बॅनरऐवजी स्थानिक पातळीवर स्वतंत्र आघाडी, पॅनल उभे करून लढविली जाते. ग्रामपंचायत ताब्यात घेण्यासाठी सत्ताधाºयांसह विरोधकांनी कंबर कसल्याने लढती या अतितटीच्या होण्याचे संकेत आहेत. विशेषत: तोंडगाव, अडोळी, तामशी, काटा, पार्डी टकमोर, अनसिंग, सावरगाव जिरे येथील निवडणुक प्रतिष्ठेची ठरत असल्याने याकडे राजकीय क्षेत्राचे लक्ष लागून आहे.
या आहेत २४ ग्रामपंचायती
वाशिम तालुक्यातील कळंबा महाली, पंचाळा, तामसी, सावंगा जहांगीर, तांदळी बु., वाळकी जहांगीर, वारा जहांगीर, अनसिंग, ब्रह्मा, किनखेडा, पिंपळगाव, तोरणाळा, वारला, अडोळी, टो, काटा, पाडी टकमोर, तोंडगाव, भोयता, उकळीपेन, कोंडाळा झामरे, पार्डी आसरा, सावरगाव जिरे, काजळंबा. या ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक होत आहे.