मासिक पाळीत लस घेताना काळजी घ्यावी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 05:08 AM2021-05-05T05:08:20+5:302021-05-05T05:08:20+5:30
वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लसीकरणावर भर दिला जात असून, महिलांनी मासिक पाळीमध्ये लस घ्यावी किंवा नाही ...
वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लसीकरणावर भर दिला जात असून, महिलांनी मासिक पाळीमध्ये लस घ्यावी किंवा नाही याबाबत संभ्रमावस्था आहे. मासिक पाळीतही योग्य दक्षता घेऊन लस घेता येते, शक्य असेल तर मासिक पाळीनंतर लस घ्यावी, असा सल्ला स्त्रीरोगतज्ज्ञांनी दिला आहे.
१ मेपासून १८ वर्षांवरील सगळ्या लोकांचे कोरोना लसीकरण सुरू झाले आहे. २८ एप्रिलपासून लसीकरणासाठी नोंदणीही सुरू झालीे. पण त्याआधी मासिक पाळीबाबतचा एक मेसेज सोशल मीडियावर फिरत असून, त्यामुळे महिलांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. यासंदर्भात स्त्रीरोगतज्ज्ञांशी चर्चा केली असता, मासिक पाळीमध्येदेखील योग्य ती दक्षता घेऊन कोरोना प्रतिबंधक लस घेता येते, असे त्यांनी स्पष्ट केले. मासिक पाळी ही नैसर्गिक गोष्ट आहे. त्याच्यामध्ये कोणताही अडथळा असू नये. परंतु, लसीकरणासाठी नोंदणी केलेली असेल आणि लस मिळत असेल तर मासिक पाळीतही लस घेऊ शकता, असे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी सांगितले. मासिक पाळीत लस घेतली तर शरीरावर कोणतेही दुष्परिणाम झाल्याचे समोर आले नाही, असेही डॉक्टरांनी सांगितले.
००००००
आतापर्यंत पहिला डोस घेतलेल्या महिला फ्रन्टलाईन वर्कर्स -२५९४
दुसरा डोस घेतलेल्या महिला फ्रन्टलाइन वर्कर्स-७५७
पहिला डोस घेतलेल्या महिला आरोग्य कर्मचारी-३४३५
दुसरा डोस घेतलेल्या महिला आरोग्य कर्मचारी-१७६०
आतापर्यंत पहिला डोस घेतलेल्या ज्येष्ठ महिला- ५९७७५
दुसरा डोस घेतलेल्या ज्येष्ठ महिला-५८६८
००००००
स्त्रीरोगतज्ज्ञ काय म्हणतात
नोंदणी केलेली असेल आणि लसीची तारीख ही मासिक पाळीमध्ये येत असेल, लस उपलब्ध असेल तर मासिक पाळीमध्ये लस घेतली तरी चालते. कोणतेही दुष्परिणाम नाहीत.
-डॉ. नितीन डोईफोडे,
स्त्रीरोगतज्ज्ञ, वाशिम.
०००
मासिक पाळी ही नैसर्गिक प्रक्रिया असून, यादरम्यान शरीरामध्ये बदल होत असतात. त्यामुळे शक्यतोवर मासिक पाळीत लस घेणे टाळलेले बरे. लसीमुळे दुष्परिणाम नाहीत.
- डॉ. शुभांगी साबू
स्त्रीरोगतज्ज्ञ, वाशिम
००००
गाईडलाईन काय सांगतात
सोशल मीडियावर मासिक पाळी आणि लसीकरणासंदर्भात मेसेज फिरू लागल्यानंतर प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने यासंदर्भात स्पष्टीकरण दिले आहे.
मुलींनी तसेच महिलांनी मासिक पाळीच्या आधी पाच दिवस आणि नंतर पाच दिवस लस घेऊ नये अशा आशयाचा मेसेज चुकीचा आहे. योग्य ती खबरदारी घेऊन लस घेता येते. योग्य आहार, शरीराला योग्यवेळी रिलॅक्स केले पाहिजे, झोप वेळेवर हवी, जास्त वेळ बसून काम करू नये. कामातून मध्येच थोडा ब्रेक घ्यावा, असा सल्ला डॉक्टरांनी दिला.