बोगस बियाणे विक्री रोखण्यासाठी सतर्क रहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:28 AM2021-06-03T04:28:59+5:302021-06-03T04:28:59+5:30

वाशिम : खरीप हंगाम तोंडावर आला असून शेतकऱ्यांकडून बियाणे, खते खरेदी सुरू झाली आहे. बोगस बियाणे, खतांमुळे शेतकऱ्यांची ...

Be vigilant to prevent the sale of bogus seeds | बोगस बियाणे विक्री रोखण्यासाठी सतर्क रहा

बोगस बियाणे विक्री रोखण्यासाठी सतर्क रहा

Next

वाशिम : खरीप हंगाम तोंडावर आला असून शेतकऱ्यांकडून बियाणे, खते खरेदी सुरू झाली आहे. बोगस बियाणे, खतांमुळे शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये, यासाठी कृषी विभागाने सतर्क राहून आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशा सूचना जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वाकाटक सभागृहात बुधवारी झालेल्या जिल्हास्तरीय निविष्ठा नियंत्रण समितीच्या सभेत ते बोलत होते.

यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी विकास बंडगर, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक दत्तात्रय निनावकर, साहाय्यक उपनिबंधक सहकारी संस्था गाडेकर यांच्यासह विविध बियाणे, खते उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी, कृषी सेवा केंद्र असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यातील बियाणे, खतांची उपलब्धता, बोगस बियाणे विक्रीला आळा घालण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजना, खरीप पीक कर्ज वितरण, आदी बाबींचा जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी आढावा घेतला.

जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. म्हणाले, जिल्ह्यात पुरेशा प्रमाणात बियाणे व खते उपलब्ध होण्यासाठी कृषी विभागाने केलेल्या नियोजनानुसार संबंधित कंपन्यांकडून पुरवठा होत असल्याची खात्री करावी. कृषी विभागाने सातत्याने बीजोत्पादन, खतनिर्मिती करणाऱ्या कंपन्यांच्या संपर्कात राहून त्यांना शासनाच्या निर्देशानुसार बियाणे, खते वितरणाबाबत सूचित करावे. बियाणे, खतांची विक्री चढ्या दराने होणार होऊ नये, यासाठी खबरदारी घ्यावी. तसेच बियाणे, खतांची गुणवत्ता तपासावी, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. कृषी विकास अधिकारी बंडगर म्हणाले, सर्व रासायनिक खत उत्पादक कंपन्यांनी जिल्ह्यातील खतांच्या वितरणाबाबतची माहिती कृषी विभागाला त्वरित उपलब्ध करून द्यावी. जेणेकरून खतविक्रीचे संनियंत्रण करणे शक्य होईल. तसेच ‘पॉस’ मशीन कार्यान्वित असलेल्या विक्रेत्यालाच खतांचे वितरण करावे, असे त्यांनी सांगितले.

००००

कृषी विभागाकडे तक्रार करण्याचे आवाहन

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तोटावार म्हणाले, बोगस बियाणे विक्रीला आळा घालण्यासाठी कृषी विभागामार्फत पथके तयार करण्यात आली असून, त्याद्वारे बियाण्यांचे नमुने तपासणीसाठी घेतले जात आहे. नुकतेच मानोरा येथे पाच लक्ष ८२ हजारांचे बियाणे जप्त करण्यात आले. चढ्या दराने बियाणे, खते विक्री होत असल्यास कृषी विभागाकडे तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले असून, सर्व कृषी सेवा केंद्रांवर कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक प्रसिद्ध करण्यात आल्याची माहिती तोटावार यांनी दिली.

Web Title: Be vigilant to prevent the sale of bogus seeds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.