भाजयुमोच्या पदाधिकाऱ्यास मारहाण; विसर्जन मिरवणूकीत घडला प्रकार
By सुनील काकडे | Published: September 10, 2022 04:57 PM2022-09-10T16:57:31+5:302022-09-10T16:57:44+5:30
प्राप्त माहितीनुसार, गणेश विसर्जन मिरवणूकीदरम्यान शहरातील बजरंग पेठ परिसरात पोलीस कर्मचारी व गणेश मंडळाचे सदस्य बंटी गाडगे यांच्यात वाद झाला.
सुनील काकडे
वाशिम - जिल्ह्यातील कारंजा येथे शुक्रवार, ९ सप्टेंबर रोजी काढण्यात आलेल्या गणेश विसर्जन मिरवणूकीदरम्यान पोलिसांनी भारतीय जनता युवा मोर्चाचे शहराध्यक्ष अमोल सुरेश गढवाले यांना जबर मारहाण केली. त्यात ते गंभीर जखमी झाले. याप्रकरणी त्यांचे वडिल सुरेश गढवाले यांनी पोलीस निरीक्षकांसह अन्य चार कर्मचाऱ्यांविरूद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
प्राप्त माहितीनुसार, गणेश विसर्जन मिरवणूकीदरम्यान शहरातील बजरंग पेठ परिसरात पोलीस कर्मचारी व गणेश मंडळाचे सदस्य बंटी गाडगे यांच्यात वाद झाला. यावेळी भाजयुमोचे शहराध्यक्ष अमोल गढवाले हे मध्यस्थी करण्यासाठी गेले असता सहायक पोलीस निरिक्षक प्रशांत जाधव, पोलीस कर्मचारी फिरोज पठाण, चरण चव्हाण, रोहण तायडे आणि अनिल राठोड या पाच जणांनी गढवाले यांना शिविगाळ करून जबर मारहाण केली. एपीआय जाधव यांनी शर्टची काॅलर पकडून अमोलला जमिनीवर लोटून दिले व चरण चव्हाणने पाय पकडले, फिरोज पठाणने गच्ची दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे सुरेश गढवाले यांनी तक्रारीत नमूद केले आहे.
गणेश विसर्जन मिरवणूकीदरम्यान पोलिसांनी विनाकारण मंडळातील सदस्यांना मारहाण केली. मध्यस्थी करण्यासाठी गेलो असता त्यांनी मलाही जबर मारहाण केली. यासंदर्भात आम्ही जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दाखल केली आहे.
- अमोल गढवाले, शहराध्यक्ष, भाजयुमो, कारंजा