पोलिसांना दीड लाख द्यावे लागले म्हणून मारला चाकू अन् दिले विहिरीत ढकलून!

By सुनील काकडे | Published: June 14, 2024 05:50 PM2024-06-14T17:50:31+5:302024-06-14T17:52:18+5:30

शत्रुघ्न याने काही दिवसांपूर्वी किसनसिंग ठाकूर नामक व्यक्तीकडून ६ लाख रुपये उसणे घेतले होते.

Because police had to pay one and half lakhs, they killed him with knife and pushed him into well in washim | पोलिसांना दीड लाख द्यावे लागले म्हणून मारला चाकू अन् दिले विहिरीत ढकलून!

पोलिसांना दीड लाख द्यावे लागले म्हणून मारला चाकू अन् दिले विहिरीत ढकलून!

वाशिम : उसनवारीने घेतलेल्या पैशांची परतफेड न करता पोलिसांत तक्रार दाखल केली. या प्रकरणात पोलिसांना दीड लाख रुपये द्यावे लागले आणि उसनवारीचे ६ लाख रुपये बुडाले म्हणून एका इसमाने आपल्यावर दोनवेळा चाकूहल्ला करून विहिरीत ढकलून दिले. या घटनेत सुदैवाने जीव बचावला, अशी आपबिती तालुक्यातील अनसिंगनजिकच्या पिंपळगाव येथील माजी सरपंच तथा विद्यमान ग्रा.पं. सदस्य पंडिता पुंजाराम भुसारे यांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे १४ जून रोजी कथन केली.

यासंदर्भातील निवेदनात पंडिता भुसारे यांनी नमूद केले आहे की, मुलगा शत्रुघ्न याने काही दिवसांपूर्वी किसनसिंग ठाकूर नामक व्यक्तीकडून ६ लाख रुपये उसणे घेतले होते. शत्रुघ्नने ते पैसे परत करण्यास टाळाटाळ केली. ही बाब ठाकूर यांनी आपणास सांगिल्यानंतर थोडेथोडे करून पैसे परत करतो, अशी ग्वाही त्यांना दिली. असे असताना ३० मे रोजी शुभम भालेराव व अन्य पाच जणांनी शत्रूघ्नला मारहाण केली व रात्रभर एका खोलीत डांबून ठेवले. ३१ मे रोजी सकाळी मोबाईलवर फोन करून शुभम भालेराव याने ६ लाख रुपये घेवून या आणि मुलाला सोडवून न्या, असे सांगितले. त्यामुळे मी अनसिंग पोलिसांत धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनीही सहकार्य करून मुलास सोडवून आणले. यावेळी तक्रार मागे घेतल्यास ६ लाख रुपये माफ करू, अशी बतावणी भालेराव याने केली. त्यामुळे प्रकरण आपसात केले.

दरम्यान, ९ जून रोजी फाट्यावरील पंपावरून गाडीत पेट्रोल भरून घरी जात असताना शेलू खु. फाट्याजवळ दोघांनी थांबवून गाडीची चावी काढून घेतली. काही वेळानंतर तिथे किसनसिंग ठाकूर व मुन्ना पडघान हे दोघे आले. यावेळी पडघान याने आम्हाला पोलिस स्टेशनला दीड लाख रुपये द्यावे लागले, असे म्हणत डोक्यात चाकू मारला. तसेच ६ लाख रुपये बुडले, असे म्हणत पुन्हा चाकूचा वार केला. किसनसिंग ठाकूर याने लोखंडी टामीने मारहाण केली. तसेच विहिरीत ढकलून दिले. सुदैवाने तिथे जमलेल्या लोकांपैकी काहींनी विहिरीतून काढून सरकारी दवाखान्यात भरती केले. तेव्हापासून आजपर्यंत दवाखान्यातच असल्याचे भुसारे यांनी निवेदनात नमूद केले आहे.

अनसिंग येथे सावकारीचे मोठे रॅकेट सक्रिय
पंडिता भुसारे यांनी अनसिंग येथे सावकारीचे मोठे रॅकेट सक्रीय असल्याचे सांगून संबंधित मंडळी बळाचा वापर करून वसूली करित असल्याचे निवेदनात नमूद केले. धाक निर्माण करण्यासाठी आपणावर जिवघेणा हल्ला करण्यात आला. संबंधितांवर कठोर कारवाई न झाल्यास मला व मुलास जिवे मारले जाईल, अशी कैफियत त्यांनी एसपींकडे मांडली.

दोषींवर होणार कठोर कारवाई!
अनसिंग येथे घडलेल्या या घटनेची सखोल चाैकशी केली जात आहे. दोषी आढळणाऱ्या प्रत्येकावर नियमानुसार कठोर कारवाई होईल. त्यात कुणाचीही गय केली जाणार नाही.
- अनुज तारे, जिल्हा पोलिस अधीक्षक, वाशिम

Web Title: Because police had to pay one and half lakhs, they killed him with knife and pushed him into well in washim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.