नियमाला डावलून रात्री उशिरापर्यंत बियर विक्री
By admin | Published: May 3, 2017 02:31 PM2017-05-03T14:31:45+5:302017-05-03T14:31:45+5:30
शहरालगतच्या मानोली रस्त्यावर बियरशॉपी नियम डावलून रात्री उशिरापर्यंत उघडी ठेवण्यात येत असल्याने बियर शौकिनांचा मोठा त्रास ग्रामस्थांना होत आहे.
मंगरूळपीर: महामार्गावरील दारूविक्री बंद झाल्याने दिलासा मिळण्याऐवजी ग्रामस्थांना मोठा त्रास होत आहे. याचा प्रत्यय मंगरुळपीर तालुक्यात येत आहे. शहरालगतच्या मानोली रस्त्यावर बियरशॉपी नियम डावलून रात्री उशिरापर्यंत उघडी ठेवण्यात येत असल्याने बियर शौकिनांचा मोठा त्रास ग्रामस्थांना होत आहे. या त्रासामुळे वैतागलेल्या ग्रामस्थांनी येथील पंचायत समितीच्या सभापती नीलिमा देशमुख यांच्याकडे तक्रारी दाखल केल्या आहेत.
उत्पादन शुल्क विभागाने आखून दिलेल्या नियमाप्रमाणे बियर शॉपी वेळेच्या आत बंद होणे आवश्यक ठरते. मात्र मंगरुळपीर शहरालगतच्या नवीन सोनखास परिसरातील एक बियर शॉपी वेळ संपल्यानंतरही सुरू राहते. दारूबंदीनंतर मद्यपींना बियर शिवाय दुसरा पर्याय नसल्याचे स्पष्ट आहे. त्यामुळे या शॉपीवर बियर पिण्यासाठी मोठी गर्दी होते व अनेक जण तेथेच बियर रिचवतात. त्यामुळे परिसरातील व या रस्त्याने येजा करणाऱ्या महिला व नागरिकांना या बाबींचा त्रास सहन करावा लागत असल्याने काही ग्रामस्थांनी याबाबत येथील पंचायत समितीच्या सभापती नीलिमा देशमुख यांचेकडे तक्रारी केल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महामार्गालगतची मद्यविक्र ी बंद झाली असून, २२० मिटर अंतराच्या बाहेरील तालुक्यातील एक देशी दारू दुकान व व २० हजार लोकवस्तीच्या आत म्हणून येथील मानोली रस्त्यावरील एक बियर शॉपी सुरू आहे. सदर बियर शॉपीचा परिसर लोकवस्तीचा असून व तळीराम याच बियर शॉपीच्या परिसरात बसून रात्री बेरात्री पर्यंत बियर पित असल्याने परिसरातील महिलांना व नागरीकांना तसेच या रस्त्याने येजा करणाऱ्या ग्रामस्थांना तळीरामांचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या बाबीची दखल उत्पादन शुल्क विभागाने घेऊन सदर बिअर शॉपी चालकाला जागेवरच बियर पिण्याची परवानगी देवू नये अशी मागणी सर्वसामान्यांनी केली आहे.