शेलुबाजार येथे ऐन पावसाळ्याच्या तोंडावर मुुख्य पुल तोडला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2019 06:18 PM2019-05-21T18:18:24+5:302019-05-21T18:18:57+5:30
मंगरूळपीरवरून शेलुबाजारमार्गे अकोलाकडे जाणाºया रस्त्यावरील मुख्य पुल तोडून त्याठिकाणी नवा पुल तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून सुरू असलेल्या महामार्गाच्या कामादरम्यान कारंजा आणि मंगरूळपीरवरून शेलुबाजारमार्गे अकोलाकडे जाणाºया रस्त्यावरील मुख्य पुल तोडून त्याठिकाणी नवा पुल तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे; मात्र ऐन पावसाळ्याच्या तोंडावर सुरू झालेले हे काम किमान २ ते ३ महिनेही पूर्ण होणार नसल्याने पावसाळा वेळेत सुरू झाल्यास अकोलाकडे होणारी वाहतूक पूर्णत: कोलमडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून वाशिम जिल्ह्यातील चार महामार्गांची कामे सद्या सुरू आहेत. सर्वच कामांची गती अत्यंत संथ असल्याने सदोदित उडणारी धूळ आणि खोदून ठेवलेल्या रस्त्यांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. अशातच पावसाळा १० ते १५ दिवसांवर येवून ठेपला असताना शेलुबाजारमार्गे अकोलाकडे जाणाºया रस्त्यावरील मोठ्या पुलाचे काम सुरू करण्यात आले आहे. वाहतूकीसाठी बाजूलाच पर्यायी रस्त्याची व्यवस्था करण्यात आली; परंतु त्यात सिमेंटचे मोठे पाईप टाकणे गरजेचे असताना या महत्वाच्या बाबीकडे दुर्लक्ष करून थातूरमातूर रस्ता तयार करण्यात आला. आगामी काही दिवसांत मोठा पाऊस झाल्यास हा रस्ता पूर्णत: वाहून जाण्याची भिती असण्यासोबतच वाहतूकही कोलमडणार असल्याचे बोलले जात आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने भविष्यातील धोके लक्षात घेता किमान पर्यायी रस्ता तरी पावसाळ्यापूर्वी मजबूत करावा, अशी मागणी सर्वच स्तरातून होत आहे.