वाशिम जिल्ह्यात दोन ठिकाणी नाफेडच्या खरेदीला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2018 03:49 PM2018-10-19T15:49:28+5:302018-10-19T15:49:42+5:30
वाशिम: जिल्ह्यातील कारंजा आणि मंगरुळपीर येथे नाफेडच्यावतीने मुग, उडिदाच्या खरेदीला सुरूवात करण्यात आली असून, अद्यापही चार ठिकाणी खरेदी केंद्र सुरू झाले नसल्याने शेतकरी वर्गात निराशा आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: जिल्ह्यातील कारंजा आणि मंगरुळपीर येथे नाफेडच्यावतीने मुग, उडिदाच्या खरेदीला सुरूवात करण्यात आली असून, अद्यापही चार ठिकाणी खरेदी केंद्र सुरू झाले नसल्याने शेतकरी वर्गात निराशा आहे. दरम्यान, मालेगाव बाजार समितीच्यावतीने तातडीने खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे.
बाजारात यंदाच्या शेतमालास नगण्य भाव मिळत असल्याने शेतकरी वर्गाकडून शासकीय खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी करण्यात येत होती. या पृष्ठभूमीवर शासनाच्यावतीने ३० सप्टेंबरपासून हमीभावाने खरेदीसाठी शेतकºयांची नोंदणी प्रक्रिया सुरू करण्याच्या सुचना देण्यात आल्या. या अंतर्गत वाशिम जिल्ह्यात उडिद आणि मुगाच्या खरेदीसाठी शेतकºयांची नोंदणी सुरू करण्यात आली. तथापि, नोंदणी प्रक्रिया पूर्ण होऊनही खरेदी केंद्र सुरू होण्याची चिन्हे दिसत नसल्याने नोंदणी करणाºया शेतकºयांत रोषाचे वातावरण होते. या संदर्भात जिल्हा उपनिबंधकांकडे निवेदन सादर करून नाफेडचे खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणीही करण्यात येत होती. त्याची दखल घेऊन अखेर कारंजा आणि मंगरुळपीर या दोन बाजार समित्यातंर्गत नाफेडच्यावतीने मुग आणि उडिदाच्या खरेदीला सुरूवात करण्यात आली. तर अद्यापही वाशिम, रिसोड, मानोरा आणि मालेगाव येथे खरेदी केंद्र सुरू करण्यात आले नाही. दरम्यान,मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉक्टर प्रमोद नवघरे यांनी मालेगाव येथे नाफे डचे खरेदी केंद्र तातडीने सुरू करण्याची मागणी केली आहे. या संदर्भात जिल्हा उपनिबंधकांकडे निवेदनही त्यांच्यावतीने सादर करण्यात आले आहे.