शिक्षकांच्या मागणीसाठी जिल्हा परिषदेच्या इमारतीवर चढून घंटानाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2019 02:55 PM2019-07-23T14:55:09+5:302019-07-23T14:55:14+5:30
प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी दोन युवकांनी जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय इमारतीवर चढून २२ जुलै रोजी घंटानाद आंदोलन छेडले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : मंगरूळपीर व कामरगाव येथील जिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षकांची पदे रिक्त असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी दोन युवकांनी जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय इमारतीवर चढून २२ जुलै रोजी घंटानाद आंदोलन छेडले. शिक्षणाधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनामुळे सदर आंदोलन स्थगित करण्यात आले.
मंगरूळपीर व कामरगाव येथील जिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्यालय येथे गोरगरीब कुटुंबातील मुले शिक्षण घेत आहेत. गत काही वर्षांपासून या दोन्ही कनिष्ठ महाविद्यालयात भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, गणित व अन्य विषय शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. याकडे शिक्षण विभागाने लक्ष देण्याची मागणी वारंवार करण्यात आली. परंतू, अद्याप याकडे लक्ष दिले नसल्याने शेवटी २२ जुलै रोजी सामाजिक कार्यकर्ते अर्जुन सुर्वे व विशाल ठाकरे यांनी जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय इमारतीवर चढून घंटानाद आंदोलन छेडले.
याची दखल घेत सामान्य प्रशासन विभागातील सहायक प्रशासन अधिकारी रुपेश निमके, वरिष्ठ सहायक प्रवीण राऊत, शिक्षण विभागातील सहायक प्रशासन अधिकारी गजानन खूळे, उपशिक्षणाधिकारी डाबेराव यांनी आंदोलकांशी चर्चा केली. जि.प.कनिष्ठ महाविद्यालयात रिक्त पदाची भरती करण्यासंदर्भात पवित्र प्रणालीमार्फत जाहिरात प्रसिद्ध केली असून, याबाबतची कार्यवाही शासनस्तरावरून सुरू आहे. घड्याळी तासिका तत्वावर तात्पुरत्या स्वरुपात वाशिम, कामरगाव, मंगरूळपीर, उंबर्डाबाजार, विठोली येथील कनिष्ठ महाविद्यालयात १३ उमेदवारांची नियुक्ती करण्यात आली आहे, असे आंदोलकांना सांगितले. त्यामुळे सदर आंदोलन स्थगित केले.
(प्रतिनिधी)