पिंप्री अवगण येथील लाभार्थी शौचालयाच्या अनुदानापासून वंचित!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2018 02:40 PM2018-09-02T14:40:59+5:302018-09-02T14:42:17+5:30
शेलूबाजार (वाशिम): स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत २०१२ मध्ये शौचालय नसलेल्या कुटूंबांचा बेसलाईन सर्व्हे करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
शेलूबाजार (वाशिम): स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत २०१२ मध्ये शौचालय नसलेल्या कुटूंबांचा बेसलाईन सर्व्हे करण्यात आला. यात मंगरूळपीर पंचायत समितीच्या अंतिम टोकावर येत असलेल्या पिंप्री अवगण गावाचे नाव समाविष्ट झाले नाही. त्यामुळे स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालयासाठी अर्ज करणाºया येथील लाभार्थींना अनुदानापासून वंचित राहावे लागले. या प्रकारामुळे स्वच्छ भारत मिशनची उद्दिष्टपूर्ती किती खरी, हा प्रश्न उपस्थित होत आहे.
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शासनाच्यावतीने उघड्यावरील शौचवारी थांबविण्यासाठी शौचालय नसलेल्या गावांचा बेसलाईन सर्व्हे करण्यात आला. यानंतर शौचालय नसलेल्या कुटूंबांची यादी तयार करून शौचालयासाठी अनुदानाची योजना आखण्यात आली. या अंतर्गत शौचालय नसलेल्या कुटूंबाला शासनाच्यावतीने शौचालय उभारणीसाठी बक्षीस म्हणून १२ हजार रुपये देण्यात येतात. वाशिम जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात हा बेसलाईन सर्व्हे करण्यात आला असून, शासनाच्या योजनेअंतर्गत मंगरूळपीर पंचायत समिती अंतर्गत असलेल्या पिंप्री अवगण येथील शौचालय उभारलेल्या कुटुंबांनी १२ हजार रुपयाचे अनुदान मिळण्यासाठी पंचायत समितीकडे अर्ज केले होते; परंतु स्वच्छ भारत मिशनच्या बेसलाईन सर्व्हेत पिंप्री गावाचा समावेश नसल्यामुळे लाभार्थींना लाभापासून वंचित राहावे लागले. या संदर्भात पिंप्री गावाचा बेसलाईनमध्ये समावेश व्हावा म्हणून संबंधित विभागाकडून शासन दरबारी वारंवार पाठपुरावा करण्यात आल्याचे सांगितले गेले; परंतु त्याची दखल अद्यापही घेण्यात आली नाही. एकिकडे जिल्हा हागणदारी मुक्त झाल्याची घोषणा करणाºया संबंधित अधिकाºयांनी या गावाचा बेसलाइनमध्ये समावेश करण्यासाठी पाठपुरावा का केला नाही, असा प्रश्न उपस्थित होतो.