आणखी पाच महिने लाभार्थींना मिळणार रेशनचे मोफत धान्य!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:26 AM2021-07-09T04:26:07+5:302021-07-09T04:26:07+5:30
संतोष वानखडे वाशिम : कोरोनाकाळात गोरगरिबांची गैरसोय होऊ नये याकरिता केंद्र शासनातर्फे प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेतून मे, जून या ...
संतोष वानखडे
वाशिम : कोरोनाकाळात गोरगरिबांची गैरसोय होऊ नये याकरिता केंद्र शासनातर्फे प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेतून मे, जून या दोन महिन्यांसाठी पात्र लाभार्थींना रेशनचे मोफत धान्य वितरित करण्यात आले. आता जुलै ते नोव्हेंबर अशा पाच महिन्यांसाठी अंत्योदय व प्राधान्य कुटुंब गटातील लाभार्थींना गहू व तांदळाचा मोफत लाभ मिळणार आहे.
गतवर्षी मार्च महिन्यापासून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढला. गतवर्षी संपूर्ण लॉकडाऊन असल्याने केंद्र शासनाने तीन महिन्यांच्या कालावधीसाठी अन्नसुरक्षा योजनेंतर्गत पात्र लाभार्थींना रेशनचे मोफत धान्य वितरित केले होते. यंदा दुसऱ्या लाटेत फेब्रुवारी ते मे या महिन्यांत कोरोनाबाधितांची संख्या वाढल्याने गोरगरीब लाभार्थींची गैरसोय होऊ नये म्हणून राज्य शासनाने मे महिन्यात मोफत धान्य वितरित केले. याच धर्तीवर केंद्र शासनातर्फेदेखील प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत अंत्योदय व प्राधान्य गटातील कुटुंबांना मे व जून या दोन महिन्यांच्या कालावधीसाठी मोफत धान्य देण्यात आले. आता जुलै ते नोव्हेंबर अशा पाच महिन्यांसाठी प्रति लाभार्थी प्रति महिना तीन किलो गहू व दोन किलो गहू मोफत मिळणार आहेत. जिल्ह्यातील ८८५ रेशन दुकानांमधून अंत्योदय योजनेच्या ४८,२७४ आणि प्राधान्य गटातील १,७७,८५७ कार्डधारकांना याचा लाभ मिळणार आहे. रेशन दुकानांमधून धान्य वाटप करताना गर्दी होऊ नये म्हणून दुकानदारांनी आवश्यक ती काळजी घ्यावी, अशा सूचना पुरवठा विभागाने दिलेल्या आहेत.
०००
काय मिळणार लाभ?
जिल्ह्यात अंत्योदयचे ४८,२७४ तर प्राधान्य गटातील १,७७,८५७ कार्डधारक आहेत. कुटुंबातील प्रति सदस्याला तीन किलो गहू व दोन किलो तांदूळ मोफत मिळणार आहेत.
०००००००
एकूण रेशन दुकान ८८५
अंत्योदय ४८,२७४
प्राधान्य गट १,७७,८५७
०००००
अशी आहे तालुकानिहाय कार्डसंख्या
तालुकाअंत्योदयप्राधान्य गट
वाशिम ८,७०२ ३४,५३३
रिसोड ९,९३१ ३२,८१९
मानोरा ६,७३१ २७,०५०
मं.पीर ७,७७० २५,२७१
मालेगाव ६,८८२ ३१,७७०
कारंजा ८,२५८ २६,४१४