ईश्वर चिठ्ठीने होणार सिंचन विहिरीच्या लाभार्थींची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2018 01:33 PM2018-12-12T13:33:35+5:302018-12-12T13:35:16+5:30
वाशिम : डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजनेंतर्गत सिंचन विहिरीकरीता प्राप्त ठरलेल्या ३५५५ अर्जांमधून ईश्वर चिठ्ठी काढून १३ डिसेंबरला लाभार्थींची निवड केली जाणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजनेंतर्गत सिंचन विहिरीकरीता प्राप्त ठरलेल्या ३५५५ अर्जांमधून ईश्वर चिठ्ठी काढून १३ डिसेंबरला लाभार्थींची निवड केली जाणार आहे.
सन २०१८-१९ करिता डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजनेसाठी १५ कोटी १५ लक्ष रुपये व क्रांतीवीर बिरसा मुंडा योजनेसाठी ५२ लक्ष ४६ हजार रुपये अनुदान जिल्हा नियोजन समितीने मंजूर केले आहे. या अनुदानाच्या अधीन राहून प्रत्येक तालुक्याला लोकसंख्येच्या प्रमाणात लक्षांक निश्चित करण्यात आला आहे. दोन्ही योजनांसाठी जिल्ह्यातून ६३४९ अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी पात्र लाभार्थी संख्या ३५५५ आहे. शासन निर्णय व मार्गदर्शक सूचनांनुसार दोन्ही योजनेतील प्राधान्यक्रमाने आलेल्या लाभार्थ्यांची निवड झालेली आहे. उर्वरित पात्र लाभार्थ्याच्या निवडीसाठी व प्रतीक्षा यादीसाठी १३ डिसेंबर २०१८ रोजी जिल्हा परिषदेच्या कृषि विभागामध्ये ईश्वर चिठ्ठीने निवड करण्यात येणार आहे.
१३ डिसेंबर रोजी पंचायत समितीनिहाय ठरलेल्या वेळेनुसार वाशिम येथे ईश्वर चिठ्ठीने लाभार्थी निवड होणार आहे. पहिल्यांदा वाशिम पंचायत समिती, त्यानंतर मालेगाव पंचायत समिती, त्यानंतर रिसोड, मंगरूळपीर, मानोरा आणि शेवटी कारंजा पंचायत समिती अंतर्गत लाभार्थ्यांची ईश्वर चिठ्ठीने निवड केली जाईल. अर्जदार शेतकºयांनी याप्रसंगी उपस्थित रहावे, असे आवाहन कृषी विकास अधिकारी नरेंद्र बारापात्रे यांनी केले.