कोरोनाकाळात ऑफलाइन पद्धतीने मिळणार ‘मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती’चा लाभ !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:29 AM2021-05-28T04:29:40+5:302021-05-28T04:29:40+5:30
शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांना ऑनलाइनची जोड देण्यात येत आहे. या योजनेंतर्गत वस्तू स्वरूपात अनुदान न देता लाभार्थींच्या बँक खात्यात ...
शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांना ऑनलाइनची जोड देण्यात येत आहे. या योजनेंतर्गत वस्तू स्वरूपात अनुदान न देता लाभार्थींच्या बँक खात्यात थेट रोख रक्कम जमा करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) प्रक्रिया लागू झाल्यापासून ‘शिष्यवृत्ती’ ही बाबदेखील या प्रक्रियेत समाविष्ट करण्यात आली आहे. इतर मागासवर्ग व बहुजन कल्याण विभागाकडून मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना ही केंद्र पुरस्कृत शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येत आहे. ही योजना शासनाच्या ‘महा-डीबीटी’ संकेतस्थळाच्या माध्यमातून ऑनलाइन पद्धतीने राबविणे क्रमप्राप्त आहे. तथापि, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने लागू केलेल्या संचारबंदी व कडक निर्बंधामुळे या योजनेच्या अंमलबजावणीचे आवश्यक प्रशिक्षण यंत्रणा पातळीवर घेण्यात आले नाही तसेच शासनाच्या ‘महा-डीबीटी’ संकेतस्थळावर या योजनेसंबंधी आवश्यक डेटाबेस अद्याप समाविष्ट झालेला नाही. त्यामुळे मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना सन २०२०-२१ या वर्षातील या योजनेचा लाभ पात्र लाभार्थींना ऑफलाइन पद्धतीनेच देण्यात येणार आहे. ही योजना थेट लाभ हस्तांतरण प्रक्रियेतून ३० सप्टेंबर २०२१ पर्यंत वगळण्यात आली आहे.