वंशाच्या दिव्यापुढेही ‘बेटी बचाव’ जिंकली; मुलींचा जन्मदर वाढला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:47 AM2021-09-21T04:47:01+5:302021-09-21T04:47:01+5:30
वाशिम : जिल्ह्यात स्त्री-पुरुष लिंगगुणोत्तरातील तफावत कमी करण्यासाठी बेटी बचाओ-बेटी पढाओ अभियान राबविण्यात येत असून, गत पाच वर्षांत प्रभावी ...
वाशिम : जिल्ह्यात स्त्री-पुरुष लिंगगुणोत्तरातील तफावत कमी करण्यासाठी बेटी बचाओ-बेटी पढाओ अभियान राबविण्यात येत असून, गत पाच वर्षांत प्रभावी जनजागृती करण्यात आल्याने मुलींचा जन्मदर वाढल्याचे दिसून येते. वंशाच्या दिव्यापुढेही ‘बेटी बचाव’ जिंकली आहे.
मुलगा हाच वंशाचा दिवा म्हणून मुलासाठी हट्ट धरला जातो. या हट्टापायी स्त्रीभ्रूणहत्यासारखेही कृत्य होते. हे रोखण्यासाठी आणि लिंगगुणोत्तरातील तफावत कमी करण्यासाठी बेटी बचाओ बेटी पढाओ अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत जिल्ह्यात विविध उपक्रम राबवून व्यापक प्रमाणात जनजागृती करण्यात आली. त्याची फलनिष्पत्ती म्हणून मुलीच्या जन्मदराचे प्रमाण वाढल्याचे दिसून येते.
................
हजार मुलांमागे मुली किती?
२०१७ ९०८
२०१८ ९१४
२०१९ ९१८
२०२० ९२०
२०२१ ९४३
...............
लिंगनिदानास बंदी
पीसीपीएनडीटी कायद्यानुसार लिंगनिदानास बंदी असून, जिल्ह्यात याची प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे. लिंगनिदान केल्यानंतर अवैध मार्गाने गर्भपात केला जात असल्याची गुप्त माहिती मिळाल्यावरून आरोग्य विभागाच्या चमूने १८ आॅगस्ट २०२१ रोजी दोन जणांवर कारवाईदेखील केली आहे.
.................
कोट
जिल्ह्यात जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांच्या मार्गदर्शनात बेटी बचाओ-बेटी पढाओ अभियानाची प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे. शहरी भागासह ग्रामीण भागातही व्यापक जनजागृती केली जात असल्याने याची फलनिष्पत्ती म्हणते लिंगगुणोत्तरातील तफावत कमी होत असल्याचे दिसून येते.
- डॉ. मधुकर राठोड
जिल्हा शल्यचिकित्सक, वाशिम