लग्नात भेट मिळालेली रक्कम दिली ‘बेटी बचाव’ अभियानाला!
By admin | Published: May 30, 2017 01:41 AM2017-05-30T01:41:07+5:302017-05-30T01:41:07+5:30
अश्विनी व श्याम घोडेस्वार या नवदाम्पत्यांचे स्तुत्य पाऊल : जिल्हाधिकाऱ्यांकडे रकमेचा धनादेश सुपूर्द
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : लग्नात भेट म्हणून मिळालेली रोख रक्कम ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अभियानाला देऊन अश्विनी व श्याम घोडेस्वार या नवदाम्पत्याने समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे. सोमवारी आमदार लखन मलिक यांच्या उपस्थितीत अश्विनी व श्याम यांनी पाच हजार रुपयांचा धनादेश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे सुपूर्द केला.
अश्विनी ही मंगरूळपीर येथील अशोक नगरमध्ये राहणाऱ्या सीताराम जमनूक यांची कन्या. तिचा विवाह कारंजा लाड येथील रामेश्वर घोडेस्वार यांचे पुत्र श्यामसोबत १४ मे २०१७ रोजी मंगरूळपीर येथे पार पडला. या वधू-वरांनी लग्नात भेट मिळणारी रोख रक्कम ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अभियानाला मदत म्हणून देण्याचा निश्चय केला. त्यानुसार पाच हजार रुपयांचा धनादेश सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आला.
यावेळी आमदार लखन मलिक यांनी नवदाम्पत्याच्या उपक्रमाचे कौतुक करत त्यांना वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा दिल्या, तसेच इतरांनीही या दाम्पत्याचा आदर्श घेऊन स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनीही नवदाम्पत्याला शुभेच्छा देऊन त्यांनी ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अभियानाला दिलेल्या मदतीबद्दल त्यांचे कौतुक केले.
यावेळी बोलताना अश्विनी व श्याम घोडेस्वार या नवदाम्पत्याने सांगितले की, आईच्या गर्भातच मुलीची होणारी हत्या थांबली पाहिजे. याकरिता स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अभियानात आमचाही खारीचा वाटा असावा, या उद्देशाने छोटीशी का होईना मदत देण्याचा आम्ही निर्धार केला. लग्न हा प्रत्येकाच्या जीवनातील आनंदाचा क्षण असतो. हा क्षण जीवनभर स्मरणात रहावा, यासाठी आम्ही हा निर्णय घेतला. त्यानुसार, लग्नात भेट मिळालेली रक्कम या अभियानाला मदत म्हणून दिल्याचे दोघांनीही सांगितले. यावेळी मुलीचे आई-वडील रूक्मिणी व सीताराम जमनूक यांच्यासह मंगरूळपीर नगर परिषदेचे शिक्षण समिती सभापती अनिल गावंडे, योगेश देशपांडे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य नीतेश मलिक, बंडू पाटील महाले, धनंजय हेंद्रे, सुनील तापडिया, प्रल्हाद गोरे, मदन पाटील, धनाजी सरसकर, संजय गांधी निराधार योजना समितीचे सदस्य विनोद मगर, गणेश ढेकणे आदी उपस्थित होते.