सावधान, दुकानातून विकत घेतलेला मोबाईलही असू शकतो चोरीचा!
By सुनील काकडे | Published: May 19, 2023 05:26 PM2023-05-19T17:26:11+5:302023-05-19T17:26:25+5:30
वाशिम जिल्ह्यात उघडकीस आला प्रकार; आरोपीवर गुन्हा दाखल
वाशिम : अलिकडच्या काळात जिवनावश्यक झालेला मोबाईल हजारो रुपये देऊन विकत घ्यावा लागतो; मात्र तो मोबाईल चोरीचा देखील असू शकतो. चोरट्याकडून कमी किंमतीत मोबाईल घ्यायचा आणि तो बनावट बिलाव्दारे अधिक किंमतीत विकण्याचा गोरखधंदा सुरू आहे. वाशिमच्या सायबर पथकाने कारंजात असे प्रकरण उघडकीस आणले असून संबंधित मोबाईल विक्रेत्यावर गुन्हा दाखल झाला असून सावधगिरी बाळगण्याची गरज निर्माण झाली आहे.
प्राप्त माहितीनुसार, कारंजा लाड येथील रहिवाशी दीपक मनवर यांचा मोबाईल हरविल्याची तक्रार त्यांनी काही दिवसांपूर्वी सीईआयआर पोर्टलवर दाखल केली होती. मोबाईलचा शोध घेत असताना तो कारंजा येथीलच रहिवाशी अल्ताफ युसूफ कालीवाले यांच्याकडे असल्याचे तपासात निष्पन्न झाले. कालीवाले यांच्याकडे याबाबत विचारणा केली असता त्यांनी कारंजा येथील सोनू मोबाईल शॉपमधून मोबाईल विकत घेतल्याचे सांगितले. इतकेच नव्हे; तर मोबाईलचे बिलही सादर केले. त्यावरून संबंधित मोबाईल शॉपचालक चोरीचे मोबाईल बनावट बिल तयार करून ग्राहकांना विकत असल्याची बाब समोर आली. याप्रकरणी मोबाईल शॉप चालकावर कारंजा शहर पोलिस ठाण्यात भादंविचे कलम ४०३, ४६५, ४७१ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ही कार्यवाही सायबर सेलचे पो.नि. प्रशांत कावरे, स.पो.नि. संदिप नरसाळे, दीपक घुगे, कोमल गाडे यांनी केली.
दरम्यान, उघडकीस आलेल्या या प्रकरणामुळे अधिकृतरित्या मोबाईल शाॅपमधून विकत घेतला जाणारा नवा मोबाईलही चोरीचा असू शकतो, ही बाब अधोरेखीत झाली असून नागरिकांनी अशा भामटेगिरीला बळी न पडता सजग राहावे, असे आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
सीईआयआर पोर्टलवर नोंदवा तक्रार
केंद्र शासनाच्या सीईआयआर वेबपोर्टलवर हरविलेल्या मोबाईलचा शोध घेणे सोयीचे झाले असून नागरिकांनी त्यांचा मोबाईल हरविल्यास किंवा चोरीला गेल्यास तत्काळ www.ceir.gov.in या संकेतस्थळावर जाऊन तक्रार नोंदवावी.
हस्तगत केलेले मोबाईल मूळ मालकांना केले परत
‘सीईआयआर’ वेबपोर्टल’वर २०२२ मध्ये जिल्ह्यात ५०२ मोबाईल हरविल्याची तक्रार दाखल झाली. त्यापैकी १६५ मोबाईलचा शोध लावण्यात आला. यासह २०२३ मध्ये आतापर्यंत १७७ मोबाईल हरविल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या. त्यातील ४७ मोबाईल चोरट्यांकडून हस्तगत करण्यात आले. या सर्व प्रकरणांमध्ये आरोपींवर कारवाई करण्यासह मोबाईल मूळ मालकांना परत करण्यात आले.
- दोन वर्षांत गहाळ झालेले मोबाईल - ६७९
- ‘सीईआयआर’मुळे सापडलेले मोबाईल - २१२
सीईआयआर पोर्टलमुळे हरविलेल्या किंवा चोरीला गेलेल्या मोबाईलचा शोध घेणे सोपे झाले आहे. नागरिकांनी त्यांच्यासोबत घडलेल्या अशा घटनांची रितसर तक्रार संबंधित वेबपोर्टलवर तत्काळ नोंदवावी. तत्काळ तपास करून न्याय देण्यासाठी पोलिस प्रशासन कटिबद्ध आहे.
- बच्चन सिंह,
जिल्हा पोलिस अधीक्षक, वाशिम