सावधान, कोरोनाबाधित वृद्धांना आवळतोय मृत्यूचा फास!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:37 AM2021-03-22T04:37:46+5:302021-03-22T04:37:46+5:30
वाशिम : कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत १४ फेब्रुवारीपासून अचानक वाढ झाली असून दैनंदिन शंभरापेक्षा अधिकच रुग्ण आढळत आहेत. अशातच चालू ...
वाशिम : कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत १४ फेब्रुवारीपासून अचानक वाढ झाली असून दैनंदिन शंभरापेक्षा अधिकच रुग्ण आढळत आहेत. अशातच चालू महिन्यात आतापर्यंत (२१ मार्च) कोरोनाने १३ जणांचा मृत्यू झाला असून त्यात सर्वाधिक प्रमाण हे ७० ते ९० वर्षे (९ जण) वयोगटातील आहे. याशिवाय ५० ते ६० वर्षे वयोगटातील ३ आणि ३० ते ४० वर्षे वयोगटातील एकाचा मृत्यू झाला आहे.
कोरोना विषाणू संसर्गाचा सर्वाधिक धोका वृद्धांनाच असल्याचे पूर्वीपासूनच आरोग्य विभागाकडून सांगितले जात आहे. दरम्यान, वाशिम जिल्ह्यात एप्रिल २०२० ते १ मार्च २०२१ या १२ महिन्यांच्या कालावधीत कोरोनाने एकूण १६० जणांचा मृत्यू झाला होता. महिनानिहाय हे प्रमाण सरासरी १३ एवढे असून ६० वर्षांवरील व्यक्तींचा मृतांमध्ये अधिक समावेश आहे. मार्च २०२१ या महिन्यात मात्र गेल्या २१ दिवसांतच १३ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. त्यात ७० ते ८० वर्षे वयोगटातील ७, ८० ते ९० वर्षे वयोगटातील २, ५० ते ६० वर्षे वयोगटातील ३ आणि ३० ते ४० वर्षे वयोगटातील एकाचा समावेश आहे.
..............
चालू महिन्यातील मृत्यूंची स्थिती
३० ते ४० वर्षे वयोगट - ०१
५० ते ६० वर्षे वयोगट - ०३
७० ते ८० वर्षे वयोगट - ०७
८० ते ९० वर्षे वयोगट - ०२
...................
कोट :
कोरोना संसर्गाचा सर्वाधिक धोका वृद्धांनाच आहे. मृतकांमध्येही वृद्धांचेच प्रमाण अधिक असल्याने ज्येष्ठ नागरिकांचे कोरोना लसीकरण सुरू करण्यात आले आहे. ‘कोविशिल्ड’ ही ७० टक्के; तर ‘को-व्हॅक्सीन’ ही लस ८० टक्के प्रभावी असून कोरोनापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांनी प्राधान्याने लसीकरण करून घेणे आवश्यक ठरत आहे. कुठलीही भीती न बाळगता लसीकरणासाठी ज्येष्ठ नागरिकांनी पुढे यावे.
- शैलेश हिंगे
निवासी उपजिल्हाधिकारी, वाशिम