कोरोनामुळे किडनीचे नुकसान लक्षणांबाबत दक्षता बाळगा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:54 AM2021-06-16T04:54:01+5:302021-06-16T04:54:01+5:30
फप्फुसांबरोबरच कोरोना विषाणू किडनीवरही परिणाम करतो. किडनीचा आजार असलेल्या व्यक्तींना संसर्ग झाल्यामुळे किडनी कायमची निकामी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. ...
फप्फुसांबरोबरच कोरोना विषाणू किडनीवरही परिणाम करतो. किडनीचा आजार असलेल्या व्यक्तींना संसर्ग झाल्यामुळे किडनी कायमची निकामी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. वाशिम जिल्ह्यात आजवर अशा घटना घडल्या आहेत. किडनीचा सौम्य आजार असणाऱ्या व्यक्तींना कोरोना संसर्गाच्या आधी डायलिसिसची गरज भासत नव्हती. मात्र, कोरोना संसर्गानंतर त्यांना डायलिसिसची आवश्यकता असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे.
मार्च ते ऑगस्टच्या काळात रुग्णालयात दाखल केलेल्या कोरोना रुग्णांपैकी २ टक्के रुग्णांच्या किडनीवर गंभीर परिणाम झाला आहे.
------------------
किडनीचा रुग्ण पॉझिटिव्ह आल्यास...
- कोरोनाचा विषाणू किडनीवर थेट संसर्ग होतो. त्यामुळे रक्त प्रवाहात गुठळ्या तयार होतात आणि या गुठळ्यांमुळे रक्त वाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होतो.
- किडनीचे कार्य सुरळीत होत नाही. किडनीच्या सेलमध्ये कोरोनाचा प्रवेश झाल्यामुळे रोगप्रतिकारशक्ती कमी होते.
- किडनीच्या आजारावर आता मोठ्या प्रमाणावर उपचार उपलब्ध आहेत. काही साध्या व सोप्या चाचण्यांच्या आधारे हे आजार ओळखून त्यावर उपचार शक्य आहेत.
- त्यामुळे आजाराचे निदान करून त्वरित उपचार करण्यासाठी रुग्णाला लवकर किडनी तज्ज्ञ डॉक्टरकडे घेऊन जाणे गरजेचे असते.
-------------
फॅमिली डॉक्टरांशी बोलूनच घ्या स्टेरॉइड
-किडनीचा आजार असलेल्या रुग्णांना कोरोना संसर्ग झाल्यास अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. औषधे घेताना फॅमिली डॉक्टरांशी संपर्क साधने आवश्यक आहे.
-कोरोना संसर्गावर मात करण्यासाठी किंवा उपचार करण्यासाठी स्टेरॉइड औषधे आवश्यक आहेत, परंतु ही औषधे घेतल्याने किडनीवर अधिक परिणाम होण्याची भीती असते.
-स्टेरॉइडमुळे होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी, तसेच अँटिबायोटिक औषधे घेण्यासाठी फॅमिली डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
-कोरोना संसर्गावर उपचार घेत असतानाही डॉक्टरांनी सुचविलेली औषधे त्यांनी ठरवून दिलेले प्रमाण आणि वेळेनुसार घेणे अत्यावश्यक आहे.
---------
बॉक्स: हे करा
- किडनीचा आजार टाळण्यासाठी नियमित आरोग्य तपासणी करावी. भरपूर पाणी प्यावे. आहारातील मिठाचे प्रमाण कमी करा. रक्तदाब-मधुमेह असल्यास अधिक काळजी घ्या. ठरावीक अंतराने लघवी-रक्त तपासावी.
-------------
बॉक्स: हे करू नये
किडनीचा आजार असताना वेदनाशामक औषधे घेऊ नयेत, फास्ट फूड घेऊ नयेत, धूम्रपान आणि मद्यपान करू नये. स्वत:हून कुठलीही औषधे घेऊ नयेत.
---------
-कोरोना संसर्गाची लागण झाल्यानंतर स्टेरॉइड आणि अँटिबायोटिक औषधांचा अति किंवा अनावश्यक वापरामुळे किडनीवर परिणाम होऊ शकतो. असे काही रुग्ण जिल्ह्यात आढळून आले आहे, शिवाय आधीच किडनीचा आजार असलेल्या काही रुग्णांनाही कोरोना संसर्ग झाला आहे. योग्य काळजी आणि उपचारानंतर यातील ९९ टक्के रुग्ण बरेही झाले आहेत.
- डॉ.पंकज गोटे
किडनी तज्ज्ञ (नेफ्रोलॉजिस्ट)
-------