भामदेवीत नावानिशी लागणार अडीच हजार वृक्ष!
By admin | Published: June 28, 2016 02:41 AM2016-06-28T02:41:11+5:302016-06-28T02:41:11+5:30
वाशिम जिल्हाधिका-यांची संकल्पना; अधिकांश फळांच्या वृक्षांचा समावेश.
सुनील काकडे / वाशिम
मुख्यमंत्री सहाय्यता निधी अंतर्गत जिल्हाधिकार्यांना प्राप्त दोन कोटी रुपयांतून भामदेवी (ता. कारंजा) या गावात विविध विकासात्मक कामे हाती घेण्यात आली असून, या गावाची सध्या सर्वांगीण विकासाकडे वाटचाल सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून येत्या १ जुलै रोजी भामदेवीत कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या नावानिशी तब्बल अडीच हजार वृक्षांची लागवड केली जाणार आहे. या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी स्वत: जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी विशेष पुढाकार घेत आहेत.
जिल्हा स्तरावरील किमान एका गावाचा ह्यमॉडेलह्ण म्हणून सर्वांगीण विकास साधण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून राज्यभरातील जिल्हाधिकार्यांना प्रत्येकी दोन कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. वाशिमचे जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी यासाठी भामदेवी (ता. कारंजा) या गावची निवड केली असून, या अंतर्गत आतापर्यंत गावातील दोन तलावांचे खोलीकरण करण्यात आले. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जलसंधारणाच्या कामांनाही येथे विशेष प्राधान्य देण्यात आले. याशिवाय मार्च २0१७ पर्यंत शिक्षण, आरोग्य, पाणी, रस्ते, दिवाबत्ती आदींसंदर्भातील सोयी-सुविधा पुरविण्याकडे विशेष लक्ष पुरविले जात असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी ह्यलोकमतह्णला दिली. जिल्हाधिकार्यांच्याच संकल्पनेतून येत्या १ जुलै रोजी भामदेवी येथे कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या नावाने वृक्ष लावण्यात येणार आहे. त्यात कडूनिंबाच्या ४00 झाडांसह जांभूळ १00, फणस २५, पिंपळ २00, वटवृक्ष २00, आंबा २00, बेल १00, सीताफळ २00, रामफळ १00, खैर १00, सागवान २00, मोह ५0, पापडा १00, रक्तचंदन २५, कवट १00, चिंच १00, आवळा १00, सीसम ५0 आणि कडू बादाम ५0, अशा विविध वृक्षांचा समावेश आहे. दरम्यान, या उपक्रमाबाबत भामदेवीमधील ग्रामस्थांमध्ये उत्सुकता असून, लोकसहभागातून खड्डेदेखील खोदण्यात आले आहेत.