Bhavna Gavli : मला ED ची कुठलिही नोटीस नाही पण; भावना गवळींनी मौन सोडलं
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2021 06:51 PM2021-08-30T18:51:14+5:302021-08-30T18:54:02+5:30
Bhavna Gavli : माझ्या ऑफिसलाही ईडीची नोटीस बजावण्यात आली नाही. पण, माझ्या संस्थेवर ईडीचे अधिकारी आलेले आहेत.
वाशिम : शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या यवतमाळ-वाशिम येथील ५ संस्थांवर सक्तवसुली संचलनालयानं (ईडी) छापे टाकले आहेत. मुंबईहून वाशिमला पोहोचलेल्या ईडीच्या अधिकाऱ्यांनी गवळींच्या संस्थांवर धाडी टाकल्या. याप्रकरणी ईडीच्या अधिकाऱ्यांची कारवाई पूर्ण झाल्यावर आपण बोलू, असं त्यांनी सांगितलं होता. त्यानंतर, गवळींनी प्रथमच मौन सोडलं आहे. ईडीने मला कुठलिही नोटीस नोटीस बजावली नसल्याचे त्यांनी सांगितले.
माझ्या ऑफिसलाही ईडीची नोटीस बजावण्यात आली नाही. पण, माझ्या संस्थेवर ईडीचे अधिकारी आलेले आहेत. येथे चौकशी करत असून सगळं आणीबाणीसारखी वागणून शिवसेनेच्या मंत्र्यांना, लोकांना दिल्या जात आहेत. त्यांना टार्गेट केलं जात आहे, असा आरोप भावना गवळी यांनी केला आहे. माझ्या संस्थेचा मी स्वतः एफआयआर नोंद केला होता. मला हिशोब मिळाला नाही आणि त्यातलं एक वाक्य पकडायचं, एक आकडा घ्यायचा आणि राईचा पर्वत बनवायचा अशा पद्धतीने या ठिकाणी काही नेत्यांनी मागच्या काही दिवसात खेळ मांडलेला आहे, असे स्पष्टीकरणही गवळी यांनी दिले.
100 कोटींच्या घोटाळ्याचा सोमैय्यांचा आरोप
भावना गवळींनी आपल्या बालाजी आर्टीकल फोर्ट कारखान्यासाठी 44 कोटी रुपये भारत सरकारच्या बँकेचे कर्ज घेतले, 11 कोटी रुपये कर्ज स्टेट बँकांकडून घेतले. विशेष म्हणजे हा 55 कोटी रुपयांचा कारखाना आपल्याच बेनामी कंपनी असलेल्या भावना अॅग्रो प्रायव्हेट लिमिटेडला केवळ 25 लाख रुपयांत विकला, असा गंभीर आरोप किरीट सोमैय्या यांनी केला आहे. त्यानंतर, नवीन बेनामी कंपनीवर आखणी 11 कोटी रुपयांचं कर्ज घेण्यात आलं. अशाप्रकारे भावना गवळींनी 100 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा गंभीर आरोप किरीट सोमैय्या यांनी केला आहे.
शिवसेना-भाजपमध्ये जुंपली
शिवसेना खासदार भावना गवळी यांच्याकडून संस्थांच्या माध्यमातून लूटमार सुरू आहे. शिवसेना नेत्यांची माफियागिरी सुरू आहे, अशी प्रतिक्रिया भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्यांनी दिली. त्यांनी गवळी यांच्याविरोधात सुरू असलेल्या कारवाईचं स्वागत केलं. शिवसेनेच्या प्रवक्त्या मनिषा कायंदे यांनी केंद्र सरकारच्या कार्यपद्धतीवर टीका केली. सत्ताधारी पक्षाकडून तपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचे आरोप आधी भाजपकडून केले जायचे. तेव्हा भाजप विरोधी पक्षात होता. मात्र आता भाजप सत्तेत आल्यानंतर त्यांच्याकडूनही तेच सुरू आहे. ईडीच्या नोटिसा अनेकांना जातात. धाडी पडतात. मात्र त्यांचं पुढे काय होतं?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.