भाजीपाल्याच्या दरात मोठी घसरण; उत्पादकांना फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2020 11:54 AM2020-12-21T11:54:50+5:302020-12-21T11:55:03+5:30
Washim Market News भाजीपाला उत्पादकांना मात्र फटका बसत असल्याचे चित्र जिल्ह्यात पाहायला मिळत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: भाजीपाल्याच्या दरात सतत घसरण सुरूच आहे. जवळपास सर्वच भाज्या आता आवाक्यात आल्याने गृहिणी खूश आहेत, तर भाजीपाला उत्पादकांना मात्र फटका बसत असल्याचे चित्र जिल्ह्यात पाहायला मिळत आहे.
जिल्ह्यात गेल्या १५ दिवसांपासून भाजीपाल्याच्या दरात सतत घसरण होत आहे. फुलकोबी, वांगी, हिरवी मिरची, पत्ता कोबी, पालक, मेथी, या फळ आणि पालेभाज्यांचे दर २० रुपये प्रतिकिलोच्या खाली आले आहेत. पोषक वातावरणामुळे भाजीपाल्याच्या उत्पादनात मोठी वाढ झाली. त्या तुलनेत मागणी नसल्याने हा प्रकार घडत आहे. दरम्यान, हिरवा कांदा, वाल शेंग, शेवगा शेंग या भाज्यांचे दर ४० ते ६० रुपये प्रतिकिलोवर पोहोचले आहेत, तर डाळींचे दर अद्यापही शंभर रुपये प्रतिकिलोपर्यंतच असल्याने गृहिणींचा भर भाजीपाल्यावरच अधिक आहे. दुसरीकडे किडींचा प्रादुर्भाव वाढल्याने उत्पादकांनाही भाजीपाला तातडीने मिळेल त्या भावात विकण्याशिवाय पर्याय उरला नाही.
सर्वच भाज्यांचे आवाक्यात आले आहेत. त्यामुळे कमी खर्चात स्वयंपाकात विविधता आणने शक्य झाले असून, आम्हाला दिलासा मिळाला आहे.
- कांताबाई सावळे
गृहिणी
भाजीपाल्याचे उत्पादन चांगले होत आहे. तथापि, दरात प्रचंड घसरण झाली आहे. फुलकोबीला १० रुपये किलोचे दरही आम्हाला मिळत नाहीत.
- सुरेश वलोकार,
उत्पादक
भाजीपाल्याचे दर घसरल्याने खरेदीला मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे व्यवसायात तेजी आली तथापि, किडींचा प्रादूर्भाव वाढल्याने जोखीमही आहे.
- दिपक कोळकर,
भाजीविक्रेता