शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मानोऱ्यात विराट मोर्चा!
By सुनील काकडे | Published: January 31, 2024 05:45 PM2024-01-31T17:45:00+5:302024-01-31T17:46:26+5:30
महाविकास आघाडीचे कार्यकर्ते, शेतकरी उतरले रस्त्यावर.
सुनील काकडे, मानोरा : सुरूवातीला ओल्या व नंतर कोरड्या दुष्काळामुळे संपूर्ण शेतीपिके वाया गेली. उरल्या-सुरल्या पिकांची अवकाळी पावसाने नासाडी केली. गतवेळच्या खरीप हंगामात काहीच पिकले नसल्याने प्रशासनानेही ४८ पैसे आणेवारी काढली. मात्र, दुष्काळ जाहीर केला नाही. या अन्यायाविरोधात संतप्त महाविकास आघाडीचे कार्यकर्ते व तालुक्यातील असंख्य शेतकऱ्यांनी जिल्ह्यातील मानोरा येथे ३१ जानेवारीला तहसिल कार्यालयावर सोटा मोर्चा काढला.
जिल्ह्यातील शेतकरी अत्यंत हलाखीचे जीवन जगत आहे. शेतकऱ्यांना दुष्काळी व अवकाळीची मदत मिळाली नाही, पीकविम्याचीही मदत तकलादू ठरली. दिवसा विज पुरवठा खंडीत केला जात असून रात्रीला जीव धोक्यात घालून पिकांना पाणी द्यावे लागत आहे. पिके उध्वस्त करणाऱ्या रानडुकरांचा बंदोबस्त करावा अथवा त्यांना मारण्याची परवानगी द्यावी, शेतक-यांची थट्टा थांबली नाही तर वारंवार रस्त्यावर उतरण्याचा इशारा यावेळी देवानंद पवार यांनी दिला.
शिवसेनेचे (उबाठा) नेते तथा माजी मंत्री संजय देशमुख यांनीही सरकारवर हल्ला चढविला. राष्ट्रवादी कॉग्रेसचे माजी आमदार अनंतकुमार पाटील, आमदार अमित झनक, शिवसेनेचे अनिल राठोड, राष्ट्रवादीचे अरविंद पाटील इंगोले यांनीही मनोगत व्यक्त केले. मोर्चात बलदेव महाराज, दिलीप सरनाईक, दिलीप भोजराज, चंद्रकांत गोटे, वैभव सरनाईक, गजानन अमदाबादकर, रविंद्र पवार, कांशीराम राठोड, नंदाताई गणोद, इफ्तेखार पटेल, गजानन राठोड, अमोल तरोडकर, अशोक करसडे, नंदाताई तायडे, वसंतराव भगत, महेश जाधव, रामनाथ राठोड, हाफीज खान, बरखा बेग यांच्यासह महाआघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शेकडो शेतकरी सहभागी झाले होते.
शेतकऱ्यांनी हाती घेतले सोटे!
विविध स्वरूपातील संकटांनी जेरीस आलेल्या शेतकऱ्यांनी बुधवारी मानोरा येथे निघालेल्या सोटा मोर्चात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. यावेळी शेतकऱ्यांच्या हातात सोटे असल्याचे पाहावयास मिळाले.