वाशिममध्ये दुचाकी, मोबाईल चोरटे पकडले; १.२५ लाखांचा मुद्देमाल जप्त
By संतोष वानखडे | Published: April 9, 2023 05:57 PM2023-04-09T17:57:20+5:302023-04-09T17:57:49+5:30
वाशिम शहरातील सिव्हील लाईन परिसरातील रिगल कॉम्पुटरसमोरून एका इसमाला पत्ता विचारण्याच्या बहाण्याने त्याच्या हातातील मोबाईल जबरदस्ती हिसकावून नेला होता.
वाशिम शहरातील सिव्हिल लाईन परिसरातून मोबाईल लंपास करणाऱ्या तसेच पोस्ट ऑफिस चौक परिसरातून दुचाकी चोरणाऱ्या चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले आहे. या दोन्ही आरोपींकडून १.२५ लाखाचा मुद्देमालही जप्त करण्यात आल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सोमनाथ जाधव यांनी रविवारी (दि.९) दिली.
वाशिम शहरातील सिव्हील लाईन परिसरातील रिगल कॉम्पुटरसमोरून एका इसमाला पत्ता विचारण्याच्या बहाण्याने त्याच्या हातातील मोबाईल जबरदस्ती हिसकावून नेला होता. याप्रकरणी वाशिम शहर पोलिस स्टेशनला आरोपीविरूद्ध गुन्हाही दाखल करण्यात आला. दुसऱ्या घटनेत स्थानिक पोस्ट ऑफिस चौकातील एका हाॅस्पिटलसमोरून चोरट्यांनी एक दुचाकी लंपास केली होती. या दोन्ही प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेने हाती घेत आरोपींना पकडून आणण्यासाठी चमू रवाना केल्या होत्या.
या प्रकरणांचा तपास करत असताना, मालेगाव शहरातील आरोपींचा या गुन्ह्यामध्ये सहभाग निष्पन्न झाल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मालेगाव शहरातील २ आरोपींना ताब्यात घेतले तसेच त्यांच्याकडून हिसकावून नेलेला मोबाईल व गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल तसेच चोरीस गेलेली मोटारसायकल असा एकूण १.२५ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी पुढील कार्यवाही पोलिस यंत्रणेकडून केली जात आहे.