‘बायोमेट्रीक’मुळे रॉकेलच्या कोट्यात ६० टक्के बचत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2019 02:31 PM2019-08-13T14:31:55+5:302019-08-13T14:31:58+5:30
स्वस्त धान्य दुकानांमध्ये धान्यासह रॉकेलचे वितरण बायोमेट्रीक पद्धतीने ‘ई पॉस मशीन’व्दारे केले जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जून २०१७ या महिन्यापासून जिल्ह्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानांमध्ये धान्यासह रॉकेलचे वितरण बायोमेट्रीक पद्धतीने ‘ई पॉस मशीन’व्दारे केले जात आहे. यामुळे बोगसगिरीला चाप बसण्यासोबतच धान्य वितरण प्रक्रिया सुरळित झाली आहे. रॉकेलच्या कोट्यातही ६० टक्क्यांपर्यंत बचत झाली आहे, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी देवराव वानखेडे यांनी दिली.
संपूर्ण संगणकीकरण प्रकल्पाअंतर्गत सर्व ठिकाणच्या रास्तभाव दुकानांमध्ये ई पॉस मशिन बसविण्यात आल्या आहेत. याव्दारे पात्र लाभार्थ्यांची बायोमेट्रिक ओळख पटविल्यानंतरच धान्य आणि रॉकेलचे वितरण केले जात आहे. यामुळे सार्वजनिक वितरण व्यवस्था गतीमान, पारदर्शक आणि लोकाभिमुख होणे शक्य झाले आहे. ‘पोर्टबिलिटी’मुळे राज्यातील कोणत्याही धान्य दुकानांतून धान्य मिळणेही शक्य झाल्याने रोजगारासाठी स्थलांतरण करणाऱ्या कुटूंबियांना त्याचा विशेष फायदा मिळत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
शिधापत्रिकाधारकांचे आधार प्रमाणिकीकरण पूर्ण
‘ई पॉस’मुळे धान्य व रॉकेलमध्ये होणारा काळाबाजार रोखणे शक्य झाले असून सर्व शिधापत्रिका आधारकार्डशी जोडण्यात आल्याने पात्र लाभार्थींना नियमित धान्य मिळू लागले आहे. जून २०१७ पासून सर्व रास्तभाव दुकानांमधून ई- पॉस मशीनद्वारे धान्य वितरण केले जात आहे. तसेच १ मे २०१८ पासून आधार प्रमाणीकरण प्रक्रिया राबविण्यात येत आहे. याअंतर्गत सर्व शिधापत्रिकाधारकांचे आधार प्रमाणिकीकरण पूर्ण झाल्याचे जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी सांगितले.