वाशिम जिल्ह्यात ‘पक्ष्यांचे निरीक्षण आणि गणना’ उपक्रम !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2017 02:19 PM2017-11-08T14:19:53+5:302017-11-08T14:21:11+5:30
मालेगाव : भारतीय पक्षी विश्वाला जागतिक स्तरावर पोहोचवणारे पक्षी शास्त्रज्ञ डॉ. सलीम अली व पक्षी अभ्यासक मारुती चितमपल्ली यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून ५ नोव्हेंबरपासून पक्षी सप्ताहास सुरुवात झाली.
मालेगाव : भारतीय पक्षी विश्वाला जागतिक स्तरावर पोहोचवणारे पक्षी शास्त्रज्ञ डॉ. सलीम अली व पक्षी अभ्यासक मारुती चितमपल्ली यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून ५ नोव्हेंबरपासून पक्षी सप्ताहास सुरुवात झाली. हा सप्ताह १२ नोव्हेंबरपर्यंत चालणार असून, परिसरातील स्थानिक तसेच स्थलांतरित पक्ष्यांची ओळख विध्यार्थ्यांना व्हावी म्हणून वत्सगुल्म जैव विविधता संवर्धन संस्थेच्या वतीने पक्ष्यांचे निरीक्षण आणि गणना उपक्रम राबविला जात आहे.
अरण्य ऋषी मारुती चितमपल्ली यांचा जन्मदिन ५ नोव्हेंबर असून डॉ. सलीम अली यांची जयंती १२ नोव्हेंबरला असते. मारुती चितमपल्ली यांना त्यांच्या जन्मदिनी शुभेच्छा देण्याकरिता व डॉ. सलीम अली यांना आदरांजली देण्यासाठी या वर्षीपासून महाराष्ट्र पक्षिमित्र संघटनेतर्फे हा सप्ताह आयोजित केला आहे. त्यानुसार महाराष्ट्र पक्षिमित्र संघटनेशी संलग्नित वत्सगुल्म जैवविविधता संवर्धन संस्थेचे पक्षीनिरीक्षक या सप्ताहात सहभागी झाले. स्थानिक पक्षी वैभवाचे संवर्धन प्रभावीपणे होण्याच्या दृष्टीने आपल्या आजूबाजूला सतत अस्तित्व दाखवून देणाºया, परिसंस्थेचा अविभाज्य भाग असलेल्या पक्ष्यांची माहिती करून घ्यायची असेल तर गणना आवश्यकच आहे. जैवविविधतेचे महत्त्व ओळखून परिसरातील स्थानिक तसेच स्थलांतरित पक्ष्यांची ओळख विध्यार्थ्यांना व्हावी म्हणून वाशीम जिल्ह्यात विविध ठिकाणी १२ नोव्हेंबरपर्यंत पक्ष्यांचे निरीक्षण आणि गणना केली जाणार आहे. वाशिम तालुक्यातील एकबुर्जी तलाव, मालेगाव तालुक्यातील कोल्ही तलाव, तपोवन जंगल परिसर, रेगाव जवळ असलेल्या तामकराड जंगल परिसरात निसर्ग भ्रमंती आयोजित केली आहे. या उपक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन वत्सगुल्म जैव विविधता संवर्धन संस्थेचे सचिव शिवाजी बळी यांनी केले आहे. सभोवतालच्या परिसरातील पक्ष्यांची गणना यात प्रामुख्याने मानवी वस्तीच्या ठिकाणी राहणाºया पक्ष्यांच्या गणनेवर भर दिला जाणार असून आपापल्या परिसरातील पक्ष्यांची गणना आवर्जून करा. या निसर्ग भ्रमंतीला संस्थेचे सदस्य मार्गदर्शन करणार आहेत. या गणनेत पक्ष्यांच्या शेकडो जातींची नोंद करण्यात येणार आहे. निवडलेल्या ठिकाणी सकाळी ६.३० ते १० व दुपारी ४ ते सायंकाळी ६ या वेळात दोन्ही वेळा गणना करण्यात येत असून जमिनीवरील, झाडाझुडपातील, पाण्यातील किंवा आकाशात उडणारे अशा सर्व प्रकारच्या पक्ष्यांची नोंद या दरम्यान करण्यात येणार असल्याचे, संस्थेने म्हटले आहे. विविध ठिकाणी पक्षीनिरीक्षण करून जिल्ह्यातील पक्ष्यांच्या प्रजाती, त्यांची वाढलेली किंवा घटलेली निवासस्थाने, त्यांच्या सवयी, दुर्मीळ पक्षी आदिंंची माहिती मिळविता येणार आहे.