नृसिंह सरस्वती स्वामींच्या जन्मोत्सवाची सांगता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2020 01:39 PM2020-02-11T13:39:31+5:302020-02-11T13:39:44+5:30
जन्मोत्सवादरम्यान अनेकांनी प्रवचन, भजन, हरीपाठ, भक्तीसंगीत, शास्त्रीय संगीत व हरिकीर्तनाच्या माध्यमातून आपली सेवा ‘श्रीं’च्या चरणी अर्पण केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
कारंजा लाड : येथील गुरूमंदिरात प्रभू दत्तात्रयांचा तिसरा अवतार असलेल्या श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांचा ७२० वा जन्मोत्सव हर्षोल्लासात साजरा झाला. २८ फेब्रूवारीपासून सुरू असलेल्या या उत्सवाची सोमवारी शैलगमन यात्रा व महाप्रसादाने सांगता करण्यात आली.
उत्सव काळात देशातील अनेक नामवंत कलाकारांनी आपली सेवा गुरूचरणी अर्पण केली. गुरूमंदिरात यानिमित्त यज्ञ पार पडला. याअंतर्गत श्री रूद्रयाग व श्री चंडियाग, ‘श्रीं’ची पालखी असे विविध कार्यक्रम घेण्यात आले. जन्मोत्सवादरम्यान अनेकांनी प्रवचन, भजन, हरीपाठ, भक्तीसंगीत, शास्त्रीय संगीत व हरिकीर्तनाच्या माध्यमातून आपली सेवा ‘श्रीं’च्या चरणी अर्पण केली. ६ फेब्रुवारी रोजी पार पडलेल्या यज्ञासाठी परगावहून अनेक ब्राम्हण मंडळी मंदिरात दाखल झाली होती. ७ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ ते १२ या वेळेत श्री यज्ञ स्वाहाकाराला सुरूवात झाली. रात्री ९ ते १२ या वेळेत पुणे येथील अंजली मालकर यांच्या गायनाचा कार्यक्रम झाला. ८ व ९ फेब्रुवारी रोजी यज्ञ व ‘श्रीं’ची पालखी असे कार्यक्रम पार पडले; तर १० फेब्रुवारी रोजी श्री यज्ञपुर्णाहुती व अवभ्रुतस्नान, महाप्रसाद आदी कार्यक्रम झाल्यानंतर जन्मोत्सवाची सांगता करण्यात आली.