‘बिट मार्शल’चा पहारा थांबला!
By admin | Published: May 31, 2017 01:03 AM2017-05-31T01:03:40+5:302017-05-31T01:03:40+5:30
केवळ तीन बिट मार्शल होते स्थापित : पोलीस कर्मचाऱ्यांची कमतरता
नंदकिशोर नारे।
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : शहर पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या ३८ मोहोल्ल्यातील कोट्यवधीची संपत्ती व सराईत गुन्हेगारावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी केवळ तीन ‘बिट मार्शल’ सोपविली होती. गत काही दिवसांपासून या बिट मार्शलमध्ये असलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पहारा थांबविला आहे. नेमका या संधीचा फायदा उचलून चोरटे आपले काम फत्ते करण्याची शक्यता नाकारता येत नाही. लोकमतच्यावतीने ३० मे रोजी बिट मार्शलमधील कर्मचाऱ्यांनी भेट दिल्यानंतर काही ठिकाणी वह्या ठेवण्यात आल्या आहेत. त्यावर भेटी दरम्यान शेरा लिहून सही करण्याचे प्रयोजन आहे. त्या वह्यांची पाहणी केली असता, २३ एप्रिलनंतर कोणत्याच अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांनी भेट दिली नसल्याचे आढळून आले.
वाशिम शहर पोलीस स्टेशन अंतर्गत दोन वर्षांपूर्वी तत्कालीन पोलीस अधीक्षक सुधीर हिरेमठ यांच्या कार्यकाळात चोरीच्या घटना व इतर गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सात बिट मार्शल दिवस पाळीत व सात बिट मार्शल रात्र पाळीमध्ये गस्तीवर असायचे. हिरेमठ यांची बदली झाल्यानंतर हळूहळू ‘बिट मार्शल’ची संख्या कमी करून ती आजमितीला केवळ तीनवर आणण्यात आली आहे.
यामुळे साहजीकच बिट मार्शलच्या कार्यक्षेत्राची व्याप्ती वाढली.
एवढ्या मोठ्या कार्यक्षेत्रावर नजर ठेवून गुन्हेगारावर लक्ष केंद्रित करणे बिट मार्शलसाठी चांगलेच जिकरीचे ठरत असताना काही दिवसांपासून हे कार्यच बंद झालेले दिसून येत आहे. या कार्यातही अनियमितता असल्याचे भेटीवर करण्यात आलेल्या शेऱ्यावरून दिसून येत आहे.
रात्रीच्यावेळी कोणत्याही प्रकारचे अनुचित प्रकार व चोऱ्यांच्या घटनेवर अंकुश ठेवण्यासाठी ‘बिट मार्शलच्या’ संख्येत वाढ करणे आवश्यक असतानासुद्धा आहेत. त्याच बिट मार्शलमधील अधिकारी, कर्मचारी ठरवून दिलेल्या भागात जात नसल्याचे दिसून आले आहे. बिट मार्शलच्या जबाबदारीची अशीच परिस्थिती असेल तर गुन्हेगारीच्या आलेखामध्ये निश्चितच वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
पोलीस विभागात ‘मॅन पॉवर’ कमी असल्याने याकडे दुर्लक्ष होत असल्याचे बोलल्या जाते.
बिट मार्शल म्हणजे काय?
पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या कार्यक्षेत्रामधील सराईत गुन्हेगार, भुरटे चोर, संशयीत व्यक्ती यांच्यावर देखरेख ठेवण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांवर जबाबदारी दिल्या जाते. ही जबाबदारी पार पाडण्यासाठी कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांना परिसरामध्ये सातत्याने गस्त घालावी लागते. ही जबाबदारी पार पाडणाऱ्याला ‘बिट मार्शल’ असे संबोधतात. वाशिम शहरात आधी सात व नंतर तीन बिट मार्शल कार्यरत असून, त्यांच्याकडून शहरात गस्त केल्या जाते; परंतु अनेक दिवसांपासून या गस्तकडे पोलीस विभागाचे दुर्लक्ष दिसून येत आहे. शहरातील रात्रीच्या चोऱ्या टाळण्यासाठी याकडे पोलीस विभागाने लक्ष देणे गरजेचे झाले आहे.
नव्यानेच प्रशासकीय व विनंतीवरुन बदल्या आम्ही केल्या आहेत. सर्वच पोलीस स्टेशनला जास्तीत जास्त मनुष्यबळ देण्याचा प्रयत्न केला आहे. या विषयावर चर्चासुद्धा झाली असून, लवकरच बिट मार्शल पूर्ववत केल्या जाणार आहे. मनुष्यबळाअभावी केवळ ते थांबले होत, यावर विचार झाला असून, लवकरच यावर तोडगा काढण्यात येणार आहे.
-मोक्षदा पाटील
जिल्हा पोलीस अधीक्षक , वाशिम