शेतीच्या बांधावर बीजेएसच्या अध्यक्षांनी साधला शेतकऱ्यांशी संवाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:35 AM2021-02-15T04:35:19+5:302021-02-15T04:35:19+5:30
महाराष्ट्र शासन व बीजेएसदरम्यान झालेल्या सामंजस्य करारानुसार जिल्ह्यात सुजलाम्-सुफलाम् अभियान वाशिम अंतर्गत बीजेएसमार्फत जलसंधारणाची कामे केली जाणार आहेत. या ...
महाराष्ट्र शासन व बीजेएसदरम्यान झालेल्या सामंजस्य करारानुसार जिल्ह्यात सुजलाम्-सुफलाम् अभियान वाशिम अंतर्गत बीजेएसमार्फत जलसंधारणाची कामे केली जाणार आहेत. या कामांचे नियोजन व पूर्वतयारी संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात १० फेब्रुवारी रोजी आढावा बैठकही पार पडली. यात बीजेएसचे संस्थापक अध्यक्ष शांतीलाल मुथाही उपस्थित होते. त्यांनी आढावा बैठकीत झालेल्या चर्चेनुसार कामांबाबत चर्चा करण्यासाठी बाळखेडा येथे प्रत्यक्ष भेट दिली. याप्रसंगी त्यांच्या सोबत जिल्हा समन्वयक शिखरचंद बागरेचा, बुलडाणा जिल्हा समन्वयक राजेश देशलहरा, बीजेएसचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल फणसे, सपना सिंग, नंदकिशोर लोंढे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातील मृद संधारण विभागाचे तंत्र अधिकारी सुहास भगत, बीजेएस जिल्हा व्यवस्थापक श्रीकांत पोफळकर तसेच शेतकरी विलासराव गायकवाड यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते. यावेळी मुथा यांनी बालखेडाच्या शेतकऱ्यांशी सुमारे दोन तास चर्चा करीत संवाद साधला. सुजलाम् सुफलाम् योजनेंतर्गत बीजेएसने जेसीबी मशीन व पोकलेनद्वारे रिसोड तालुका तसेच बालखेडा व परिसरातील गावात केलेल्या कामांची माहिती शेतकऱ्यांकडून जाणून घेतली. यावेळी शेतकऱ्यांनी बालखेडा येथे व परिसरात बीजेएसने नाला खोलीकरण रुंदीकरण करून येथील शेतकऱ्यांना बारमाही शेती व फळबाग शेती करण्याची संधी मिळाली आणि उत्पादन वाढल्याची कबुलीच शेतकऱ्यांनी मुथा यांना दिली.