रक्तपेढ्या ऑक्सिजनवर; चार दिवस पुरेल एवढाच साठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 04:38 AM2021-04-03T04:38:12+5:302021-04-03T04:38:12+5:30
कोरोना विषाणू संसर्गापासून नागरिकांचे रक्षण करण्यासाठी जिल्ह्यात १७ जानेवारीपासून लसीकरण मोहीम सुरू झाली आहे. लस घेतल्यानंतर किमान दोन महिने ...
कोरोना विषाणू संसर्गापासून नागरिकांचे रक्षण करण्यासाठी जिल्ह्यात १७ जानेवारीपासून लसीकरण मोहीम सुरू झाली आहे. लस घेतल्यानंतर किमान दोन महिने रक्तदान करता येत नाही. यामुळे रक्तदान करणाऱ्यांची संख्या झपाट्याने घटली असून रक्ताचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता उद्भवली आहे. दरम्यान, लस घेण्यापूर्वी रक्तदान करण्यासंबंधी वारंवार आवाहन करण्यात येत आहे; परंतु गेल्या अनेक दिवसांपासून जिल्ह्यात कुठेही पूर्वीसारखी रक्तदान शिबिरे आयोजित करण्यात आलेली नाहीत किंवा रक्तपेढीत येऊन रक्तदान करण्यासंबंधीची मानसिकताही अनेकांची राहिली नाही. त्यामुळे येत्या काही दिवसांत रक्ताचा मोठा तुटवडा निर्माण होण्याचे संकेत आहेत.
............................
शासकीय रक्तपेढीत सात दिवसांचाच साठा
शासकीय रक्तपेढीत महिन्याला किमान २५२ बॅग रक्ताचा साठा ठेवला जातो; मात्र गेल्या काही दिवसांपासून रक्तदानाचे प्रमाण झपाट्याने खालावले असून आजमितीस केवळ १५२ बॅग रक्त उपलब्ध आहे. रक्ताची आवश्यकता असलेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्यास हा साठा सात दिवसांपेक्षा अधिक काळ पुरणार नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.
...................
रक्तपेढी, जिल्हा रुग्णालय
वाशिम येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात शासकीय रक्तपेढी कार्यान्वित आहे. जिल्हाभरात रक्तदान शिबिरांचे आयोजन करून तसेच इच्छुकांकडून स्वयंस्फूर्तीने रक्तपेढीत येऊन रक्तदान केले जाते. यामुळे रक्ताची उणीव भासत नसे; मात्र गेल्या काही दिवसांपासून रक्तदानाचे प्रमाण कमी झाल्याने तुटवडा निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. मधुकर राठोड यांनी दिली.
.................
डाळे रक्तपेढी, वाशिम
वाशिम शहरातील डाळे रक्तपेढीचे संचालक डाॅ. नारायण डाळे यांच्याशी चर्चा केली असता, रक्ताचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाल्याचे ते म्हणाले. रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने पुढाकार घेऊन रक्तदान करावे, गावोगावी शिबिरे घेऊन रक्ताचा साठा वाढविण्याकरिता प्रयत्न व्हायला हवे; अन्यथा परिस्थती गंभीर होईल, असे त्यांनी सांगितले.
.................
लसीकरणाआधी करा रक्तदान
कोरोना लस घेतल्यानंतर २८ दिवस आणि दुसरा डोस घेतल्यानंतर पुन्हा २८ दिवस रक्तदान करता येत नाही. त्यामुळे नियमित रक्तदान करणाऱ्या दात्यांनी कोरोना लस घेण्याआधीच रक्तदान करावे. यामुळे अपघात, प्रसूतीदरम्यान होणारे मृत्यू टाळता येणे शक्य होईल, असे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे.