वाशिम जिल्ह्यात रक्तपेढ्या ऑक्सीजनवर; रक्ताचा तुटवडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 11:22 AM2021-04-03T11:22:40+5:302021-04-03T11:23:03+5:30
Blood Banks : शासकीय रक्तपेढीत आजमितीस केवळ १५२ बॅग रक्तसाठा उपलब्ध असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली.
वाशिम : जिल्ह्यात जिल्हा सामान्य रुग्णालयात शासकीय व एक खासगी अशा दोन रक्तपेढ्या कार्यान्वित आहेत. एका रक्तपेढीला महिन्याकाठी साधारणत: २५२ बॅग रक्ताची गरज भासते; मात्र शासकीय रक्तपेढीत आजमितीस केवळ १५२ बॅग रक्तसाठा उपलब्ध असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली.
कोरोना विषाणू संसर्गापासून नागरिकांचे रक्षण करण्यासाठी जिल्ह्यात १७ जानेवारीपासून लसीकरण मोहीम सुरू झाली आहे. लस घेतल्यानंतर किमान दोन महिने रक्तदान करता येत नाही. यामुळे रक्तदान करणाऱ्यांची संख्या झपाट्याने घटली असून रक्ताचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता उद्भवली आहे. दरम्यान, लस घेण्यापूर्वी रक्तदान करण्यासंबंधी वारंवार आवाहन करण्यात येत आहे; परंतु गेल्या अनेक दिवसांपासून जिल्ह्यात कुठेही पूर्वीसारखी रक्तदान शिबिरे आयोजित करण्यात आलेली नाहीत किंवा रक्तपेढीत येऊन रक्तदान करण्यासंबंधीची मानसिकताही अनेकांची राहिली नाही.
शासकीय रक्तपेढीत सात दिवसांचाच साठा शिल्लक
शासकीय रक्तपेढीत महिन्याला किमान २५२ बॅग रक्ताचा साठा ठेवला जातो; मात्र गेल्या काही दिवसांपासून रक्तदानाचे प्रमाण झपाट्याने खालावले असून आजमितीस केवळ १५२ बॅग रक्त उपलब्ध आहे. रक्ताची आवश्यकता असलेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्यास हा साठा सात दिवसांपेक्षा अधिक काळ पुरणार नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.