धाबेकर महाविद्यालयात रक्तदान शिबिर उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:37 AM2021-01-21T04:37:05+5:302021-01-21T04:37:05+5:30
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष गवई होते. उद्घाटन राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. राजेश बुरंगे यांनी केले. यावेळी ...
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष गवई होते. उद्घाटन राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. राजेश बुरंगे यांनी केले. यावेळी कि. न. गो. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विनय कोडापे, महाविद्यालय विकास समितीचे विजय काळे, दिशा एज्युकेशन फाउंडेशनचे डॉ. सुशील देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. बुरंगे म्हणाले की, सध्या रक्ताचा तुटवडा असून, तो भरून काढण्याचे आवाहन उभे ठाकले आहे. रक्तदान शिबिराच्या माध्यमातून रक्त तुटवडा भरून निघेल व गरजू रुग्णांचे जीव वाचतील. त्यामुळे रक्तदानाची चळवळ अधिक वृद्धिंगत व्हावी, असे आवाहन त्यांनी केले. रक्तदान हे श्रेष्ठदान असल्यामुळे त्यासाठी सदैव तत्पर असावे. या माध्यमातून समाजसेवेची संधी युवकांनी घेतली पाहिजे, असे डॉ. गवई म्हणाले.
याप्रसंगी कोरोना योद्धा ठरलेले उमेश आगरकर, प्रज्वल गुलालकरी यांचा शाल, स्मृतिचिन्ह, पुस्तक व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यासह रासेयो कार्यक्रम अधिकारी पुरस्कार प्राप्त डॉ. राजेश माथूरकर, उत्कृष्ट रासेयो स्वयंसेवक पुरस्कार प्राप्त करण वंजारे व पूजा खडसे यांनाही सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. योगेश पोहोकार यांनी केले. संचालन डॉ. अशोक जाधव यांनी केले; तर आभार डॉ. कैलास गायकवाड यांनी मानले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी डॉ. अविनाश उकंडे, डॉ. अमित क्षार, डॉ. श्रीकांत झापर्डे, संगीता गायधने, मंगेश धामणीकर, प्रफुल्ल गवई, श्रीकांत थोरात, डॉ. चंदन वासनीक, यांनी पुढाकार घेतला.