‘लोकमत’तर्फे आजपासून जिल्ह्यात रक्तदान महायज्ञ !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:27 AM2021-07-02T04:27:52+5:302021-07-02T04:27:52+5:30
वाशिम : कोणत्याही कठीण प्रसंगात आठवतात, ती रक्ताची नाती. याच नात्यांची गुंफण आणखी विस्तारण्यासाठी आणि रक्ताचा तुटवडा भासू नये ...
वाशिम : कोणत्याही कठीण प्रसंगात आठवतात, ती रक्ताची नाती. याच नात्यांची गुंफण आणखी विस्तारण्यासाठी आणि रक्ताचा तुटवडा भासू नये याकरीता ‘लोकमत’ने पुढाकार घेतला आहे. स्वातंत्र्यसंग्राम सेनानी व ‘लोकमत’चे संस्थापक संपादक स्व. जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त २ ते १५ जुलैदरम्यान ‘लोकमत-रक्ताचं नातं’ या मोहिमेंतर्गत महारक्तदान शिबिर आयोजित केले असून, २ जुलै रोजी रक्तदान महायज्ञाला प्रारंभ होणार आहे.
कोरोना, लॉकडाऊनमुळे राज्यात रक्ताचा तुटवडा आहे. जिल्ह्यातही रक्ताचा तुटवडा आहे. सिकलसेल, थॅलेसेमिया यासारखे गंभीर व दुर्मीळ आजार जडलेल्या रुग्णांना, तसेच प्रसूतीदरम्यान अधिक रक्तस्राव झाल्यास, अपघातांमध्ये गंभीर जखमी झाल्यास संबंधितांनाही रक्ताची गरज भासते. तो दूर करण्यासाठी ‘लोकमत’ने एक पाऊल उचलले आहे. २ जुलैपासून महारक्तदान शिबिरास प्रारंभ होणार आहे. महारक्तदान शिबिरात अनेकजण सहभाग नोंदवित आहेत. सामाजिक, राजकीय, प्रशासकीय, पोलीस, शिक्षण, व्यापारी, वैद्यकीय यासह विविध क्षेत्रातून प्रतिसाद मिळत असून गरजू रुग्णांशी रक्ताचे नाते जोपासण्यासाठी रक्तदानाच्या या महायज्ञात आपणही सहभागी व्हा, असे आवाहन करण्यात आले.
००००
कोट
राज्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर रक्तसंकलनाला मोठा फटका बसला. रक्ताचा हा तुटवडा भरून काढण्यासाठी ‘लोकमत’ने रक्तदान शिबिराचा स्तुत्य उपक्रम हाती घेतला. गरजू रुग्णांना वेळेवर रक्तपुरवठा व्हावा याकरिता सर्वांनी या रक्तदान शिबिरात सहभाग नोंदवावा.
- भावना गवळी
खासदार, शिवसेना
००००
रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी अधिकाधिक नागरिकांनी रक्तदान करणे अपेक्षित आहे. रक्तदानासाठी ‘लोकमत’ने घेतलेला पुढाकार प्रशंसनीय आहे. जिल्ह्यातील अधिकाधिक नागरिकांनी या उपक्रमात सहभाग नोंदवून रक्तदान करावे.
- राजेंद्र पाटणी
आमदार, भाजपा
०००००
कोरोनाकाळात रक्त संकलन कमी झाल्याने राज्यात रक्ताचा तुटवडा आहे. विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया, गरजू रुग्णांना रक्ताची आवश्यकता असते. ‘लोकमत’ने रक्तदान शिबिर आयोजित केले, ही बाब निश्चितच स्तुत्य व अभिनंदनीय आहे. सर्वांनी या शिबिरात सहभाग घ्यावा.
- अॅड. किरणराव सरनाईक
आमदार, शिक्षक मतदारसंघ
०००००