वाशिम जिल्ह्यात आठ दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा उपलब्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 12:24 PM2021-04-29T12:24:49+5:302021-04-29T12:25:05+5:30
Blood Banks in Washim : आजमितीस केवळ १२० बॅग रक्तसाठा उपलब्ध असून, तो आगामी आठ दिवसातच संपणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्ह्यात जिल्हा सामान्य रुग्णालयात शासकीय व वाशिम शहरात एक खासगी अशा दोन रक्तपेढ्या कार्यान्वित आहेत. एका रक्तपेढीला महिन्याकाठी साधारणत: २५२ बॅग रक्ताची गरज भासते; मात्र शासकीय रक्तपेढीत आजमितीस केवळ १२० बॅग रक्तसाठा उपलब्ध असून, तो आगामी आठ दिवसातच संपणार आहे. याशिवाय खासगी रक्तपेढीत दोनच दिवस पुरेल, एवढाच रक्तसाठा उपलब्ध असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.
कोरोना विषाणू संसर्गापासून नागरिकांचे रक्षण करण्यासाठी जिल्ह्यात दि. १७ जानेवारीपासून कोरोना लसीकरण मोहीम सुरू झाली आहे. लस घेतल्यानंतर किमान दोन महिने रक्तदान करता येत नाही. त्यामुळे रक्तदान करणाऱ्यांची संख्या झपाट्याने घटली असून, रक्ताचा तुटवडा निर्माण होत आहे. दरम्यान, लस घेण्यापूर्वी रक्तदान करण्यासंबंधी वारंवार आवाहन करण्यात येत आहे; परंतु गेल्या अनेक दिवसांपासून जिल्ह्यात पूर्वीसारखी रक्तदान शिबिरे आयोजित करण्यात आलेली नाहीत किंवा रक्तपेढीत येऊन रक्तदान करण्यासंबंधीची मानसिकताही अनेकांची राहिली नाही. त्यामुळे रक्तसाठा घटला असून येत्या काही दिवसांत रक्ताचा मोठा तुटवडा निर्माण होण्याचे संकेत आहेत. त्यामुळे युवकांनी पुढाकार घेत रक्तदान करण्याची मागणी होत आहे.