निराधार योजनेतील बोगस लाभार्थी ‘रडार’वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:36 AM2021-01-18T04:36:31+5:302021-01-18T04:36:31+5:30
वाशिम : राज्य व केंद्र शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध सामाजिक अर्थसाहाय्य योजनेचा गैरफायदा हजारो लोक घेत आहेत. अशा व्यक्तींकडून ...
वाशिम : राज्य व केंद्र शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध सामाजिक अर्थसाहाय्य योजनेचा गैरफायदा हजारो लोक घेत आहेत. अशा व्यक्तींकडून होणारी शासनाची लुबाडणूक थांबवून पात्र लाभार्थींना लाभ देण्यासाठी प्रशासनाकडून बोगस लाभार्थींची शोध मोहीम राबविण्यात येणार आहे. येत्या १९ जानेवारीपासून ही मोहीम सुरू होणार असून, यासाठी महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणही देण्यात आले आहे.
वाशिम जिल्ह्यात श्रावण बाळ, संजय गांधी निराधारमधील विविध प्रकार आणि इंदिरा गांधी निराधार योजनेतील मिळून ९० हजारांपेक्षा अधिक लाभार्थी आहेत. शासनाने २० ऑगस्ट २०१९ च्या शासन निर्णयान्वये राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तवेतन योजना, तसेच केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजना, विधवा महिलांची इंदिरा गांधी विधवा निवृत्ती वेतन योजना, दिव्यांग व्यक्तींची इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती वेतन योजनेच्या मानधनात वाढ केली आहे. या वाढीचा लाभ खऱ्या लाभार्थींना मिळावा, या हेतूने या सर्व योजनांतील लाभार्थींची शोध मोहीम प्रशासनाकडून राबविण्यात येत आहे. मंडल अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील, तसेच जन्म मृत्यू निबंधकांचा या मोहिमेसाठी आधार घेतला जाणार आहे.
----------
अशी होणार तपासणी
श्रावणबाळ योजना : या योजनेंतर्गत लाभार्थींचा ६५ वर्षे किंवा त्यावरील वयाचा सक्षम पुरावा, २१ हजारांच्या आतील उत्पन्नाचा दाखला, कुुटुंबाकडील शेती, तसेच शासकीय किंवा निमशासकीय नोकरीची पडताळणी
----
संजय गांधी योजना (विधवा) : पतीचे निधन झाल्याचा पुरावा, २१ हजारांच्या आतील उत्पन्नाचा दाखला, मुलाचे वय २५ वर्षांपेक्षा अधिक आहे काय, कुुटुंबाकडील शेती, तसेच शासकीय किंवा निमशासकीय नोकरीची पडताळणी
---------
संजय गांधी योजना (घटस्फोटित): घटस्फोटाचा सक्षम पुरावा, दुसरा विवाह न झाल्याचा पुरावा, मुलाचे वय २५ वर्षांपेक्षा अधिक आहे काय, २१ हजारांच्या आतील उत्पन्नाचा दाखला, कुुटुंबाकडील शेती, तसेच शासकीय किंवा निमशासकीय नोकरीची पडताळणी,
------------