महामारीतही मुन्नाभाई एमबीबीएस जोरात; कारवाईचे प्रमाण नगण्य!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 11:32 AM2021-06-26T11:32:30+5:302021-06-26T11:32:47+5:30
Bogus Doctors : . जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या पथकाने २० पेक्षा अधिक बोगस डाॅक्टरांवर धडक कारवाई केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत संपूर्ण जिल्हा अक्षरश: हैराण झाला. याच काळात विशेषत: ग्रामीण भागात बोगस डाॅक्टरांचे जणू पीक आले. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या पथकाने २० पेक्षा अधिक बोगस डाॅक्टरांवर धडक कारवाई केली. मात्र, त्यामुळे सुरू असलेल्या या गंभीर प्रकारावर कुठलेही विशेष नियंत्रण मिळाल्याचे दिसत नाही.
वैद्यकीय शिक्षणात कुठलीही डिग्री मिळविली की, स्वत:च्या नावापुढे डाॅक्टर लावण्याची कायद्यानेच परवानगी मिळते. मात्र, स्वत:चे मूळ शिक्षण लपवून अनेक जण एमबीबीएस, बीएएमएस असल्याचे भासवितात. ग्रामीण भागात त्याची फारशी शहानिशा कोणी करत नसल्याने हा प्रकार अलीकडच्या काळात अधिकच फोफावला आहे. अशा बोगस डाॅक्टरांमुळे मात्र वेळप्रसंगी रुग्णांचा जीवही धोक्यात सापडतो. त्यामुळे चुकीच्या प्रकारावर नियंत्रणासाठी धडक मोहीम राबवावी, अशी मागणी होत आहे.
तक्रार आली तरच कारवाई
जिल्ह्यातील ग्रामीण भागातील अधिकांश गावांमध्ये बोगस डाॅक्टर्सकडून रुग्णांवर उपचार केले जातात. असे असताना राजरोस घडत असलेल्या या गंभीर प्रकाराची तक्रार आल्याशिवाय आरोग्य विभागाकडून कुठल्याही प्रकारची ठोस कारवाई केली जात नाही.