४०० पालकांनी केली पुस्तके परत; आपण कधी करणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:41 AM2021-05-09T04:41:55+5:302021-05-09T04:41:55+5:30
वाशिम : समग्र शिक्षा अभियानांतर्गत पुस्तक वापरले की अनेक विद्यार्थी ते रद्दीतही विकत असल्याचे चित्र होते. आता यावर शिक्षण ...
वाशिम : समग्र शिक्षा अभियानांतर्गत पुस्तक वापरले की अनेक विद्यार्थी ते रद्दीतही विकत असल्याचे चित्र होते. आता यावर शिक्षण विभागाने पर्यावरणाचे संवर्धन आणि कागदाची बचत करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पाठ्यपुस्तकाचा पुनर्वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील जवळपास ४०० पालकांनी पुस्तके परत केली आहेत.
समग्र शिक्षा अभियानाची अंमलबजावणी झाल्यानंतर २००९ पासून राज्यातील नगर परिषद, जिल्हा परिषदेच्या तसेच खासगी अनुदानित संस्थांच्या पहिली ते आठवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके वाटप केली जातात. विद्यार्थ्यांची शंभर टक्के उपस्थिती, गुणवत्तापूर्ण शिक्षण हा त्यामागचा हेतू आहे. या योजनेत राज्यभरात सुमारे एक कोटी २० लाखांच्या आसपास पुस्तकांचे वाटप होते, तर यासाठी दोनशे कोटींवर खर्च दर वर्षी येतो. एकट्या वाशिम जिल्ह्यातच अनुदानित शाळा, जिल्हा परिषद व नगर पालिकांच्या मिळून किमान एक लाख ४० हजारांच्या आसपास पुस्तकांचे वाटप होते. एका पाठ्यपुस्तकाचा संच विद्यार्थ्यांनी चांगला वापरला तर दोन ते तीन वर्षे सहजपणे तो उपयोगात येतो. मात्र, यापूर्वी या पुनर्वापरावर विशेष लक्ष न दिल्याने दर वर्षी नवे पुस्तके वाटप करण्याची योजना सुरू होती. शासनाने आता पाठ्यपुस्तकांची पुनर्वापर योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार जुनी पुस्तके परत मागविली असून, आतापर्यंत जवळपास ४०० पालकांनी पुस्तके परत केली आहेत. उर्वरित १ लाख ४० हजार पालक पुस्तके केव्हा परत करतात, याकडे लक्ष लागून आहे.
......
मागील वर्षी संच वाटप १,४०,०००
यावर्षी मागणी १४०,०००
......
संचारबंदीमुळे शाळा बंद
कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वाशिमसह राज्यातील सर्वच शाळा बंद आहेत. त्यामुळे जुनी पुस्तके परत करण्यात अडचणी आल्या आहेत.
आतापर्यंत ४०० पालकांनी जुनी पुस्तके परत केली आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर पुस्तके परत करण्याच्या या उपक्रमाला गती येईल, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
पहिल्या व दुसऱ्या वर्गातील मुले शक्यतोवर पाठ्यपुस्तके जपून वापरत नसल्याने या दोन्ही वर्गातील जुनी पुस्तके परत येण्याची शक्यता कमी आहे.
......................
पुस्तके परत केली
गेल्यावर्षी मोफत मिळालेली पाठ्यपुस्तके चांगल्या स्थितीत असतील तर परत करण्याचे आवाहन शिक्षकांनी केले आहे. पुस्तके चांगल्या स्थितीत असल्याने शिक्षकांकडे पुस्तके परत केली आहेत.
- राजेंद्र वानखडे
पालक
........
जुनी पुस्तके परत करावी, असे शिक्षकांनी सांगितले होते. त्यानुसार पुस्तके परत केली असून, इतर पालकांनीदेखील जुनी पुस्तके परत करावी.
- संदीप चव्हाण, पालक
\\\\\\\\\\\\\\\
्र_प्रतिसाद मिळेल
जुन्या पुस्तकांचा पुनर्वापर करण्याचा उपक्रम राबविला जात आहे. सध्या कोरोनामुळे हा उपक्रम प्रभावित झाला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर या उपक्रमाला प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा आहे.
- अंबादास मानकर
शिक्षणाधिकारी, वाशिम
००००००००००००००
कोणत्या वर्गात किती विद्यार्थी
पहिली १४१०३
दुसरी १४९५७
तिसरी १५७२९
चौथी १६७५१
पाचवी १८२५२
सहावी १८७८५
सातवी १९०३६
आठवी १६९३८
०००००००००००००००