Boom in Automobile Sector : वाहन विक्रीत वाढ; ऑटोमोबाईल क्षेत्राला झळाळी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2020 01:17 PM2020-10-13T13:17:48+5:302020-10-13T13:18:36+5:30
Washim News दुचाकी, चारचाकी व ट्रॅक्टर मिळून जवळपास ३७० वाहनांची आगाऊ नोंदणी झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : अनलॉकमध्ये ऑटोमाबाईल क्षेत्राला सुगीचे दिवस आले असून, गत सप्टेंबर महिन्याच्या तुलनेत यंदाच्या सप्टेंबरमध्ये दुचाकी, चारचाकीसह ट्रॅक्टरच्या विक्रीत चांगलीच वाढ झाली आहे.
कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात २४ मार्चपासून लॉकडाऊन आहे. मे महिन्यापासून अनलॉकचे टप्पे सुरू झाले असून विविध उद्योग, व्यवसायाचे दरवाजे खुले करण्यात आले. आॅटोमोबाईल क्षेत्रही खुले झाले असून, विविध प्रकारच्या वाहनांची खरेदी करण्यासाठी ग्राहकांची पावले शोरूमकडे वळत आहेत. गतवर्षीच्या सप्टेंबर महिन्याशी तुलना करता यंदाच्या सप्टेंबर महिन्यात दुचाकी, चारचाकी व ट्रॅक्टरच्या विक्रीत वाढ झाल्याने वाहनबाजारात तेजी आल्याचे दिसून येते. गतवर्षी सप्टेंबर महिन्यात केवळ ६५० दुचाकींची विक्री झाली होती. यंदा याच कालावधीत तब्बल १०४९ दुचाकींची विक्री झाली. ट्रॅक्टरच्या विक्रीत दर दुपटीपेक्षा अधिक वाढ झाली. आगामी दसरा, दिवाळी सण लक्षात घेता मनपसंद वाहन मिळावे याकरीता वाहनांची आगाऊ नोंदणी करण्याकडेही ग्राहकांचा कल असल्याचे दिसून येते. दुचाकी, चारचाकी व ट्रॅक्टर मिळून जवळपास ३७० वाहनांची आगाऊ नोंदणी झाली आहे.
दुचाकीला सर्वाधिक मागणी
जिल्ह्यात दुचाकी वाहनाला सर्वाधिक मागणी असल्याचे दिसून येते. दसरा जवळ येत असल्याने मनपसंद दुचाकी दसºयाच्या मुहुर्तावर मिळावी याकरीता अनेकांनी मनपसंद दुचाकीची आगाऊ मागणी नोंदविली. वाहनबाजारात तेजी असून, दसरा दरम्यान यामध्ये आणखी तेजी येण्याचे संकेत आहेत.
वाहन बाजारात तेजी
कोरोनाकाळात वाहतुक व्यवस्था प्रभावित होती. खासगी व परिवहन महामंडळाच्या बसेस, ऑटो आदी बंद असल्याने याचा फटका अनेकांना बसला. अनलॉकच्या टप्प्यात वाहन बाजारात तेजी येत आहे.
- रौनक टावरी, दुचाकी वितरक, वाशिम