दोन्ही आरोपींना अटक
By admin | Published: September 2, 2015 02:22 AM2015-09-02T02:22:58+5:302015-09-02T02:22:58+5:30
महागाव येथील प्राणघातक हल्लाप्रकरण.
रिसोड (जि. वाशिम): पूर्ववैमनस्यातून डव्हळे कुटुंबातील दोन सदस्यांनी जमधाडे कुटुंबातील चार जणांवर प्राणघातक हल्ला केल्याची घटना तालुक्यातील महागाव येथे ३१ ऑगस्टच्या पहाटे ३.३0 वाजताच्या सुमारास घडली होती. या घटनेतील डव्हळे कुटुंबातील दोन्ही आरोपींना अटक करण्यात रिसोड पोलिसांनी १ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास यश आले. रिसोडनजीकच्या मेहकर रोड परिसरातून आरोपींना पकडण्यात आले. दरम्यान, या घटनेतील तिघांची प्रकृती दुसर्या दिवशीही चिंताजनक असून, त्यांच्यावर अकोला येथे उपचार सुरू आहेत. महागाव येथील स्वस्त दुकानदार संजय तुकाराम डव्हळे यांचे देवानंद जमधाडे व प्रतिक जमधाडे यांचे सोबत रेशनच्या माल वाटपावरुन वाद झाला होता. दोघांचेही घर एकमेकांचे घरासमोर आहेत. त्यातच एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याच्या संशयावरून डव्हळे व जमधाडे कुटुंबात धूसफुस सुरू होती. यामधून संजय डव्हळे व गजानन डव्हळे यांनी ३१ ऑगस्टला पहाटेच्या सुमारास देवानंद जमधाडे यांचे घरात घुसून देवानंद व पुनम देवानंद जमधाडे, पुनमची आई छायाबाई यांना जबर मारहाण केली. ही घटना घडत असताना शेजारी राहणारे सिद्धार्थ मनोहर जमधाडे व त्याची आजी वच्छलाबाई यांनी आरडाओरड करीत देवानंदचे घरी गाठले. वच्छलाबाईने अडविण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिलाही कोयत्याने मारले. यामध्ये वच्छलाबाईच्या हाताची बोटे तुटून पडली. संजय व गजानन डव्हळे या दोन आरोपींविरूद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला होता. तेव्हापासून सदर दोन्ही आरोपी फरार होते. घटनेच्या काही कालावधीनंतर पोलिसांनी तपासाची चक्रे गतीने फिरवित घटनेत प्रत्यक्ष सहभागी असलेले मुख्य दोन आरोपींना अटक केली. पोलिसांना मिळालेल्या माहितीवरुन विशेष पथकाने दोन्ही आरोपींना मेहकर फाट्यावरुन ताब्यात घेतले. उपविभागीय पोलीस अधिकारी संग्राम सांगळे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक एम.ए. रउफ, पोलीस उपनिरीक्षक रवि हुंडेकर पोलीस कर्मचारी संजय क्षीरसागर, राजेश गिरी, गजानन पांचाळ, विनोद घनवट यांनी कामगिरी बजावली.