दोघांनी अडविली शेतीची वाट; शेतकरी धडकले तहसिल कार्यालयात!
By संतोष वानखडे | Published: April 18, 2023 03:42 PM2023-04-18T15:42:06+5:302023-04-18T15:42:26+5:30
शेतकऱ्यांना शेती करताना नैसर्गिक आपत्तीबरोबरच मानवनिर्मित संकटांचा सामनादेखील करावा लागत आहे.
वाशिम : वाशिम तालुक्यातील देवठाणा बु. ते अडगाव-गणेशपूर या दरम्यान रस्ता डांबरीकरणाचे काम सुरू असताना, दोन शेतकऱ्यांनी अतिक्रमण करून रस्ता अडविला आहे. या पार्श्वभूमीवर त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी मंगळवारी (दि.१८) वाशिम पंचायत समिती व तहसिल कार्यालयावर धडक देत अतिक्रमण हटविण्याची मागणी लावून धरली.
शेतकऱ्यांना शेती करताना नैसर्गिक आपत्तीबरोबरच मानवनिर्मित संकटांचा सामनादेखील करावा लागत आहे. शेतात जाणे सुकर व्हावे याकरीता शासनाच्या विविध योजनेच्या माध्यमातून रस्त्यांचे जाळे विणले जात आहे. शेतापर्यंत रस्ता येत असल्याने शेतकऱ्यांनी या रस्ता कामाचे स्वागत करणे अपेक्षीत असताना, अनेक ठिकाणी अतिक्रमण करून काही मोजक्या शेतकऱ्यांकडूनच रस्ता अडविला जात असल्याचे प्रकार जिल्ह्यात समोर येत आहेत. वाशिम तालुक्यातील देवठाणा बु. ते अडगाव-गणेशपूर या रस्त्याचे डांबरीकरणाचे काम सुरू आहे. मात्र, दोन शेतकऱ्यांनी रस्त्यालगत अतिक्रमण करीत हा रस्ता अडविला आहे.
यापूर्वीदेखील रस्ता अडविला होता, त्यावेळी तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करीत १८ सप्टेंबर २०१८ रोजी वाशिम तहसिलदारांकडे अहवाल पाठविला होता. अतिक्रमण असल्याचे नमूद असतानाही, आतापर्यंत या रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्यात आले नसल्याने अन्य शेतकऱ्यांना शेतात जाणे कठीण झाले आहे. या पार्श्वभूमीवर देवठाणा येथील सरपंच राजश्री दिनेश खडसे यांच्यासह शेतकऱ्यांनी १८ एप्रिल रोजी पंचायत समितीचे उपसभापती गजानन गोटे यांच्याशी चर्चा केली तसेच तहसिलदारांना निवेदनही दिले. रस्त्यावरील अतिक्रमण हटवून न्याय देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली.