सामूहिक प्रयत्नांतून कोरोना संसर्गाची साखळी तोडू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:44 AM2021-05-20T04:44:53+5:302021-05-20T04:44:53+5:30
पंचायत समितीचे नोडल अधिकारी साई चव्हाण, ग्रामविकास अधिकारी सतीश वर्घट यांच्या प्रमुख उपस्थितीत दक्षता समितीच्या सभेचे आयोजन करण्यात आले ...
पंचायत समितीचे नोडल अधिकारी साई चव्हाण, ग्रामविकास अधिकारी सतीश वर्घट यांच्या प्रमुख उपस्थितीत दक्षता समितीच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. कोरोना संसर्गाची दुसरी लाट तुलनेने अधिक तीव्र असून जीवघेणीदेखील आहे. असे असताना संसर्गाची तिसरी लाटसुद्धा येणार असल्याची शक्यता आरोग्य विभागाकडून वर्तविण्यात येत आहे. यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये गावोगावी सतर्कता बाळगण्याचे आवाहन करण्यात येत आहे. दुसऱ्या लाटेवर मात करून तिसरी लाट कशी रोखता येईल. त्यासाठी कुठल्या उपाययोजना राबविण्याची गरज आहे, याबाबत दक्षता समितीच्या सभेत चर्चा झाली.
कोरोनाचे थैमान रोखायचे असेल तर सर्वांनी एकजूट दाखवून शासकीय नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. तिसरी लाट बालक व तरुणांसाठी धोकादायक ठरू शकते. त्यामुळे महामारीला गंभीरतेने घेऊन गाव निरोगी राहण्यासाठी गावकरी व दक्षता समितीने सहकार्य करावे, असे आवाहन उपस्थित अधिकाऱ्यांनी यावेळी केले. त्यास सर्वांनी अनुमोदन देत सामूहिक प्रयत्नांतून कोरोनावर मात करू, असा निर्धार व्यक्त केला. यावेळी पोलीस पाटील शीतल हाते, आरोग्य कर्मचारी कैलास उपाध्ये, योगीता वानरवडे, तलाठी संजय आडे उपस्थित होते.
.............
कोट :
गावातील प्रत्येक कुटुंबात कोणीही आजारी असेल तर संबंधितांनी स्वत:हून पुढे येत आरोग्य तपासणी करून घ्यावी. विशेषत: लहान मुले, तरुण, ज्येष्ठांनी आरोग्याबाबत अधिक सजग राहावे. आरोग्यासंबंधी कुठलीही तक्रार असल्यास आरोग्य पथक तथा ग्रामपंचायतीच्या दक्षता पथकाशी संपर्क साधावा.
- सतीश वर्घट
ग्रामविकास अधिकारी, काजळेश्वर