लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत किसान सन्मान योजनेला ‘ब्रेक’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2019 05:52 PM2019-03-20T17:52:05+5:302019-03-20T17:52:22+5:30
लोकोपयोगी योजनांसोबतच शेतकऱ्यांसाठी महत्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या किसान सन्मान निधी योजनेच्या अंमलबजावणीला ‘ब्रेक’ लागला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : सद्या राज्यभरातील सर्वच जिल्ह्यांमध्ये लोकसभा निवडणुकीची धामधुम सुरू असून प्रशासकीय यंत्रणेतील अधिकारी, कर्मचारी त्यात गुंतले आहेत. यामुळे मात्र अन्य लोकोपयोगी योजनांसोबतच शेतकऱ्यांसाठी महत्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या किसान सन्मान निधी योजनेच्या अंमलबजावणीला ‘ब्रेक’ लागला आहे. पात्र शेतकऱ्यांच्या याद्यांमधील त्रुट्या दुर करण्याचे काम प्रलंबित असून याद्या ‘अपलोड’ करण्याची प्रक्रिया देखील पूर्णत: थंडावली आहे.
शेतकºयांना निश्चित उत्पन्न मिळावे, या उद्देशाने केंद्र शासनाने हाती घेतलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी पात्र शेतकरी कुटुंबाची माहिती संकलित करण्याची कार्यवाही ७ फेब्रूवारीपासून जोरासोरात सुरू करण्यात आली होती. १० फेब्रूवारीपर्यंत गावनिहाय पात्र खातेधारक शेतकºयांच्या याद्या तयार करून शेतकºयांचे बँक खाते क्रमांक, आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक प्राप्त करणे व त्याच्या नोंदणी विहित नमुन्यात नोंद करण्याची जबाबदारी ग्रामस्तरीय समितीने पार पाडली. त्यानंतर १५ ते २० फेब्रुवारीदरम्यान पात्र शेतकरी कुटुंबांची यादी गावामध्ये प्रसिद्ध करून त्यावर हरकती मागविण्यात आल्या. मात्र, अशातच लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्याने किसान सन्मान निधी योजनेसाठी पात्र ठरलेल्या काहीच शेतकºयांच्या खात्यात २ हजार रुपयांची पहिली किस्त जमा झाली असून उर्वरित शेतकरी त्यापासून अद्याप वंचित आहेत. किमान निवडणुक होईस्तोवर या योजनेला फारशी गती देखील मिळणार नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटूंबांच्या याद्या तयार करणे, अर्जांमधील त्रुट्या दुर करणे, याद्या वेबसाईटवर अपलोड करण्याचे काम वाशिम जिल्ह्यात जवळपास ९५ टक्के पूर्ण झाले आहे. मात्र, सद्या निवडणुकीची धामधुम सुरू असल्याने ही प्रक्रिया काहीअंशी ठप्प झाली आहे. निवडणुकीनंतर मात्र पुन्हा त्यास गती देण्यात येणार आहे.
- सागर हवालदार
जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी, वाशिम