महामार्गावरील धुळीने गुदमरतोय श्वास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:39 AM2021-03-06T04:39:30+5:302021-03-06T04:39:30+5:30
राज्य रस्ते विकास महामंडळाकडून वाशिम-पुसद महामार्गाच्या कामाला जवळपास चार महिन्यांपूर्वी सुरुवात करण्यात आली. या कामामुळे पुढे दळणवळण अधिक सोयीचे ...
राज्य रस्ते विकास महामंडळाकडून वाशिम-पुसद महामार्गाच्या कामाला जवळपास चार महिन्यांपूर्वी सुरुवात करण्यात आली. या कामामुळे पुढे दळणवळण अधिक सोयीचे होणार असल्याने चालकांसह जनतेतूनही समाधानकारक प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. आता या मार्गाच्या कामासाठी पूर्वीचा रस्ता खोदून मुरूम व खडी टाकून दबाई सुरू करण्यात येत आहे. पूर्वी पावसाळा अखेर वातावरणात आर्द्रता असल्याने या मार्गावर चालक, प्रवाशांना फारसा त्रास जाणवला नाही; परंतु आता उन्हाळा सुरू झाला असून, रखरखत्या उन्हामुळे कच्च्या कामातील धूळ मार्गावर उडून वाहनांंच्या खिडक्यांद्वारे आत शिरत आहे. त्यामुळे या मार्गावर एसटी किंवा खासगी वाहनांतून प्रवास करणारे प्रवासी, तसेच चालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
-----------------------
श्वसनाचे आजार जडण्याची भीती
वाशिम-पुसद महामार्गावर उडत असलेली धूळ प्रवाशांसह चालकांच्या नाकातोंडात जात आहे. या प्रकारामुळे पुढे श्वसनाचे आजार जडण्याची भीती आहे; तसेच धूळ उडाल्यानंतर समोरचे वाहनही दिसत नसल्याने चालकाचे नियंत्रण सुटून अपघात घडण्याची शक्यता आहे. या धुळीपासून बचावासाठी भर उन्हात वाहनांच्या खिडक्या बंद कराव्या लागतात. त्यामुळे या कामावर पाण्याचा पुरेसा वापर करावा, अशी मागणी प्रवासी आणि चालकवर्गाकडून केली जात आहे.
००००००००००००
कोट : वाशिम-पुसद महामार्गाचे काम होत असल्याने आम्हाला मोठा दिलासा मिळणार आहे; परंतु आता उन्हाळ्याच्या दिवसांत कच्च्या कामावर पाण्याचा पुरेसा वापर होत नसल्याने धुळीचे लोट रस्त्यावर उडतात. त्यामुळे श्वास कोंडल्यासारखा होतोच; शिवाय समोरून येणारे वाहनही दिसत नाही. अशात अपघात घडण्याची सतत भीती असते.
- गणेश पाठे,
चालक, दगड उमरा
-----------------------
कोट : गेल्या महिनाभरापासून वाशिम-पुसद मार्गावर केवळ धूळच धूळ उडत असून, ही धूळ नाकातोंडात जात असल्याने श्वास गुदमरल्यासारखे होते. यामुळे वाशिम ते बाभूळगाव या अवघ्या ८ किलोमीटर अंतरात प्रवास करताना सतत खोकत राहावे लागते. याची दखल संंबंधितांनी घ्यावी आणि कामावर पाण्याचा पुरेसा वापर करावा.
- सुभाष कालापाड,
ग्रामस्थ, बाभूळगाव
---