कर पावती पुस्तकाचे प्रकरण मिटविण्यासाठी मागितली ५० हजाराची लाच
By संतोष वानखडे | Published: July 8, 2024 07:58 PM2024-07-08T19:58:09+5:302024-07-08T19:59:04+5:30
३० हजाराची लाच स्विकारली : आमगव्हाण सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवकासह चौघांवर गुन्हा
वाशिम: कर वसूली करून ग्रामपंचायतला रक्कम जमा न करता परस्पर वसुली केल्याबाबतचे प्रकरण मागे घेणे आणि नमुना नंबर १० पावती पुस्तकाबाबतचे प्रकरण मिटवून देण्यासाठी तक्रारदाराला ५० हजाराची लाच मागितली. यापैकी ३० हजाराची रक्कम स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ८ जुलै रोजी सरपंच सासरे यांना रंगेहात पकडले.
याप्रकरणी ग्रामसेवक राजेश विठ्ठलराव ठाकरे (५७), सरपंच सासरे देविदास ऊर्फ दयाराम चरणदास मेहळा (मेहल्डे) (६३), सरपंच पती सतिश देविदास मेहळा (३१) व उपसरपंच देवेंद्र भिमराव कानोडे (३९) अशा चौघांवर मानोरा पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तक्रारदार यांचे विरूद्ध ग्रामपंचायतने नमुना नंबर १० पावती पुस्तकात कर वसुली करून ग्रामपंचायतला रक्कम जमा न करता परस्पर वसुली केल्याबाबतची तक्रार मागे घेणे आणि नमुना नंबर १० पावती पुस्तकाबाबतचे प्रकरण मिटवून देणेकामी मदत करण्याकरीता ग्रामसेवक राजेश ठाकरे, सरपंच सासरे देविदास मेहळा यांनी सरपंच, उपसरपंच यांचे करिता ३० हजार रुपये लाचेची मागणी तक्रारदाराकडे केली.
सदर लाच मागणीस आरोपी देवेंद्र कानोडे यांनी प्रोत्साहन दिले. ८ जुलै रोजी सापळा करवाई दरम्यान आरोपी सतीश मेहळा यांनी सदर प्रकरण मिटवण्यासाठी १० हजार रुपये स्वतः करीता वेगळे मागणी केली. तसेच सरपंच सासरे यांनी ५० हजाराची मागणी करून तक्रारदाराकडून ३० हजार रुपये लाचेची रक्कम आमगव्हाण येथे राहते घरी स्विकारले. उर्वरित २० हजार रुपये लगेच देण्याचे सांगितले. याप्रकरणी आरोपींना ताब्यात घेऊन त्यांचेविरुद्ध पो.स्टे. मानोरा येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सदर कारवाईची पोलीस उप अधीक्षक गजानन आर.शेळके, पोलीस निरीक्षक बालाजी तिप्पलवाड, पोलिस उपनिरीक्षक दुर्गादास जाधव, कर्मचारी नितीन टवलारकर, विनोद अवगळे, विनोद मार्कंडे ,आसिफ शेख, योगेश खोटे, रवींद्र घरत, समाधान मोघाड यांनी केली.
लाच मागितली तर तक्रार करा!
कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करुन देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, वाशिम येथे तक्रार नोंदवावी किंवा संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस उप अधीक्षक गजानन शेळके यांनी केले.